पदाधिकारी, अधिकाऱ्यांत हमरीतुमरी!
By admin | Published: August 2, 2015 12:07 AM2015-08-02T00:07:27+5:302015-08-02T00:11:37+5:30
सातारा पंचायत समिती सभा : माजी उपसभापतींना करावी लागली मध्यस्थी
सातारा : सातारा पंचायत समितीच्या शनिवारी झालेल्या सभेत पंचायत समिती सदस्य प्रवीण धस्के व तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांच्यात जोरदार हमरी-तुमरी झाली. धस्केंनी कांबळे यांना खात्यातील कर्मचाऱ्याचा पगार रोखण्याच्या मुद्द्यावरून धारेवर धरल्याने दोघांत जोरदार खडाजंगी झाली. माजी उपसभापती विजय काळे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. वीज विभाग व एसटी विभागाच्या कारभारावरही सदस्यांनी सभेत ताशेरे ओढले.
सभापती कविता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात ही सभा झाली. सभेला राष्ट्रगीताने सुरुवात झाली. सदस्य प्रवीण धस्के यांनी विचारलेल्या जलयुक्त शिवार अंतर्गत होणाऱ्या कामांबाबत कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांना प्रश्न विचारला असता, कांबळे यांनी फडतरवाडी, अंगापूर, देगाव, वर्णे या गावांनी कामे पूर्ण झाल्याचे लिहून दिलेय, असे स्पष्ट केले. त्यावर धस्के यांनी कांबळेंना धारेवर धरले. ‘तुम्ही देत असलेली माहिती चुकीची आहे. तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत आहात,’ असा आरोप केला. तसेच कृषी खात्यातील पाटील नावाचा कर्मचारी अनेक दिवसांपासून आजारी असताना त्याचा पगार ११ महिन्यांपासून रखडवला आहे.
स्वत:च्याच संवर्गातील कर्मचाऱ्यावर कांबळे असा अन्याय करत असल्याचा स्पष्ट आरोप धस्के यांनी केल्यानंतर कांबळे यांनी संताप व्यक्त केला. दोघांत जोरदार खडाजंगी झाली. या वादामुळे सभागृहात स्तब्धता पसरली. धस्के यांनी कांबळे तुम्ही जबाबदारीने बोला, कायद्याचे ज्ञान व शिक्षण घेऊनच आम्ही सभागृहात आलो आहोत. तुमच्या बांधाला माझा बांध नाही. लोकांच्या प्रश्नांबाबत आम्ही बोलतो आहोत, असे सांगितले. हा वाद पेटण्याची चिन्हे दिसत असतानाच माजी उपसभापती विजय काळे यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला.
विश्रांती साळुंखे, वनिता कणेरकर, जयवंत कुंभार या सदस्यांनीही एसटीच्या कारभाराबाबत जोरदार टीका केली. यावेळी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल डॉ. स्नेहांजली सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)