अधिकाऱ्यांनो, माणुसकीच्या नात्याने अलर्ट राहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:17 AM2021-05-04T04:17:38+5:302021-05-04T04:17:38+5:30

दहिवडी : माण-खटावमधील कोरोनाच्या प्रकोपामुळे रुग्णांसाठी बेड्स, वैद्यकीय उपचार, ऑक्सिजन मिळविण्यासाठी नातेवाइकांना जिवाच्या आकांताने धावाधाव करावी लागत आहे. ...

Officers, be alert as a human being! | अधिकाऱ्यांनो, माणुसकीच्या नात्याने अलर्ट राहा !

अधिकाऱ्यांनो, माणुसकीच्या नात्याने अलर्ट राहा !

Next

दहिवडी : माण-खटावमधील कोरोनाच्या प्रकोपामुळे रुग्णांसाठी बेड्स, वैद्यकीय उपचार, ऑक्सिजन मिळविण्यासाठी नातेवाइकांना जिवाच्या आकांताने धावाधाव करावी लागत आहे. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आणि बिकट असूनही शासनाचे अधिकारी हलगर्जीपणा दाखवत आहेत. या आणीबाणीच्या काळात सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या नात्याने तरी अलर्ट राहून काम करावे, असे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे.

माण-खटाव तालुक्यांच्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, जनार्दन कासार, तहसीलदार बाई माने, किरण जमदाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, डॉ. लक्ष्मण कोडोलकर आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी आमदार जयकुमार गोरे यांनी कोरोना प्रकोपामुळे अत्यंत विदारक बनलेले माण-खटाव मतदारसंघातील चित्र सर्वांसमोर मांडले. दोन्ही तालुक्यांत सुरू असलेल्या कोरोना उपचार केंद्रांमध्ये रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत की नाही, वेळेवर आणि पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतोय की नाही, अत्यावश्यक औषधे आणि इंजेक्शन्स दिली जातात की नाही, याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. रुग्णांना वेळेवर बेड्स उपलब्ध करून देण्याकडेही लक्ष दिले जात नाही. वीज वितरणचा भोंगळ कारभार अत्यवस्थ रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. वारंवार वीज जाण्यामुळे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचे काम ठप्प होत आहे. ऑक्सिजन संपल्याने काही रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. शासकीय असो किंवा खासगी, प्रत्येक उपचार केंद्राला ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी शासनाने पेलली पाहिजे. पोलिसांनी ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदोबस्त दिला पाहिजे. ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या चालकांना दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. मतदारसंघातील सर्वच उपचार केंद्रांमधील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि सर्वसाधारण बेड्सची माहिती लोकांना मिळण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरू करा, अशा सूचनाही आ. गोरे यांनी दिल्या.

०३दहिवडी

फोटो : माण-खटाव मतदारसंघाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना आ. जयकुमार गोरे. समवेत प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी. (छाया : नवनाथ जगदाळे)

Web Title: Officers, be alert as a human being!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.