अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हाती कटावण्या, अंबर अन् हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:07 AM2021-02-05T09:07:27+5:302021-02-05T09:07:27+5:30
वाई : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपण कायम एसी रुममध्ये फायली चाळताना पाहिलेले असेल, पण वाईमध्ये शनिवारी काहीसे वेगळेच चित्र ...
वाई : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपण कायम एसी रुममध्ये फायली चाळताना पाहिलेले असेल, पण वाईमध्ये शनिवारी काहीसे वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सामाजिक कार्यकर्ते, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हातात कटावणी, हातोडी, अंबर घेऊन बाहेर पडले होते. खिळेमुक्त झाड अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत होते.
विविध कारणांनी झाडांना खिळे ठोकले जातात. त्यामुळे अकाली वाळतात. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून जनतेत जनजागृती केली होती. त्यानुसार वाई येथील कृष्णाई सोशल फोरममधील सामाजिक संस्था वाई वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी सात वाजता वाई शहरातील सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी, विद्यार्थी, वाई वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी झाडे खिळेमुक्त करण्यासाठी हातात कटावण्या, हातोडी, अंबर घेऊन किसनवीर महाविद्यालयासमोर जमले.
यावेळी वाक्षेटपाल महेश झांजुर्णे, उपविभागीय बांधकाम अधिकारी श्रीपाद जाधव, सामाजिक संस्था प्रतिनिधी प्रशांत डोंगरे, राजू खरात, दिलीप शिंदे यांच्यासह पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने एकत्र आले. खिळेमुक्त झाडे अभियानाला प्रारंभ केला. किसनवीर महाविद्यालय ते सायली हॉटेल या एक किलोमीटरवरील सर्व झाडे खिळेमुक्त करण्यात आले. एक ट्रॉली छोटे मोठे बोर्ड काढण्यात आले.
वाई-पाचगणी रस्त्यावर व्यावसायिकांनी जाहिरातीचे फलक खिळे ठोकून झाडावर लावले आहेत. यामुळे झाडांचा श्वास गुदमरत असून झाडांसह पर्यावरणाच्या मुळावर येत होते. झाडावरील खिळे हटाव मोहीम वाईतील सामाजिक संस्था व प्रशासनाने हाती घेतली आहे. सुरूरपासून पाचगणी रस्त्यावर वडाच्या झाडावर लावण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या जाहिराती यामध्ये शाळा, क्लासेस, कॉम्प्युटर क्लासेस, कॉस्मेटिक्स, हॉटेलच्या जाहिराती, लॉजिंग-बोर्डिंग, दुकानाची जाहिरात अशा विविध प्रकारच्या जाहिराती शहरासह संपूर्ण रस्त्याच्या झाडावर लटकतात. त्यामुळे रस्त्यांना बकाल स्वरूप आले होते.
चौकट :
अन्यथा कायदेशीर कारवाई
झाडावर खिळे ठोकून जाहिराती लावणे तसेच रस्त्यावर अतिक्रमण करून जाहिरातीखा बोर्ड लावणे बेकायदेशीर आहे. अशा व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी वाई शहर, वाई-सुरूर व वाई- पाचवड रोडवर मोठ्या प्रमाणावर अभियान राबविले जाणार आहे. झाडावर लावलेले फलक नागरिकांनी काढावेत अन्यथा कारवाई केली जाणार आहे, असा इशारा वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी दिला आहे.
कोट:
व्यावसायिक झाडावर खिळे ठोकून जाहिराती लावतात. हे बेकायदेशीर असून अशा व्यावसायिकांवर व सार्वजनिक जागेत अतिक्रमण करून व्यवसायाचे जाहिरात फलक लावणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
- श्रीपाद जाधव,
उपविभागीय बांधकाम अधिकारी वाई
२४वाई-खिळे
वाई येथे शनिवारी खिळेमुक्त झाड अभियान राबविण्यात आले. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. (छाया : जावेद खान)