आरोग्य केंद्राला अधिकाऱ्याचे वावडे
By admin | Published: July 26, 2015 09:40 PM2015-07-26T21:40:55+5:302015-07-27T00:18:40+5:30
खटावमधील स्थिती : वैद्यकीय सेवेअभावी रुग्णांची खासगी रुग्णालयांकडे धाव
खटाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नसल्याने रुग्णांनी मोठी परवड होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थे असल्याने आता रुग्णांनीच आरोग्य केंद्राकडे पाठ फिरवली आहे. हे आरोग्य केंद्र म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.खटावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना याठिकाणी केवळ एकच वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेकदा उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्याविना गैरसोय होते. त्यामुळे रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठ फिरवली आहे.
सर्व सामान्य नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधोपचार मोफत मिळावेत, याकरिता शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने खटावसह परिसरातील रुग्णांना सातारा, कोरेगाव किंवा वडूज या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे.किरकोळ अपघात किंवा एखादी घटना घडल्यानंतर संबंधित रुग्णाला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात आणले जाते. मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला खासगी रुग्णालयात पाठवावे लागत आहे. या सर्व धावपळीत जर एकादा रुग्ण दगावला तर कोणाला दोषी धरायचे? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे
उभा ठाकला आहे. प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियुक्ती करून
रुग्णांची होणारी परवड थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून
होत आहे. (वार्ताहर)
एकाच अधिकाऱ्यावर मदार
खटावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत १९ गावे, १७ ग्रामपंचायती तर सहा उपकेंद्रे आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीकरिता येणाऱ्या रुग्णांची सतत वर्दळ असते. परंतु गेल्या काही वर्षापासून हे प्राथमिक आरोग्य केंद्र एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर चालवले जात आहे.
आज नाही उद्या या...
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासी राहणे बंधनकारक असून देखील येथे वैद्यकीय अधिकारी राहताना दिसत नाहीत. सध्या कोणत्याच अधिकाऱ्याकडे रुग्णालयाचा पद्भार नाही. त्यामुळे डिस्कळ किंवा मायणी येथून डॉक्टर तपासणीकरिता येत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात तपासणीकरिता येत आहे. परंतु प्रत्येक वेळी डॉक्टर नसल्याचे निदर्शनास येत आहे. कर्मचाऱ्यांकडूनही डॉक्टर नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मी शेवटी खासगी रुग्णालयात तपासणीकरिता जाण्याचा निर्णय घेतला आहे.
- विकास फडतरे, ग्रामस्थ
आजारामुळे गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात हेलपाटे मारत आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्यामुळे ताडकळत बसावे लागत आहे. वैद्यकीय सेवेअभावी रुग्णांची हेळसांड होत असून, हे किती दिवस चालणार आहे.
- तानाजी मोरे, ग्रामस्थ