Satara: काम एकाचे, घेऊन आला दुसराच; कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणाऱ्याला अधिकाऱ्यांनी सुनावले
By नितीन काळेल | Published: October 12, 2023 06:59 PM2023-10-12T18:59:04+5:302023-10-12T18:59:23+5:30
यानंतर मात्र, संबंधितांनी विभागातून काढता पाय घेतला
सातारा : जिल्हा परिषदेत दुसऱ्याचे काम घेऊन येणाऱ्याने कर्मचाऱ्याशी उध्दटपणा केला. तसेच बराचवेळ हुज्जत घातली. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी चमकोगिरी करणाऱ्याला चांगलेच सुनावले. यानंतर मात्र, संबंधितांनी विभागातून काढता पाय घेतला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील एकजण सातारा जिल्हा परिषदेतील एका विभागात कामासाठी आला होता. संबंधित खंडाळा तालुक्यातील एकजणाचे काम घेऊन आला होता. त्याने जिल्हा परिषदेतील संबंधित विभागात जाऊन कर्मचाऱ्याकडे कामाबाबत सांगितले. यावर कर्मचाऱ्याने योग्य उत्तर दिले. मात्र, संबंधित व्यक्ती वारंवार हुज्जत घालत होती. हा सर्व प्रकार इतर कर्मचारी तसेच कामासाठी आलेले नागरिकही पाहत होते. बराचवेळ संबंधितांकडून हा प्रकार सुरू होता.
विभागातील कर्मचाऱ्याबरोबर हुज्जत आणि अरेरावी सुरू असल्याचा प्रकार अधिकाऱ्यांना समजला. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्याने पुणे जिल्ह्यातून आलेल्या संबंधिताला चांगलेच सुनावले. त्यामुळे संबंधित व्यक्ती चांगलीच वरमली. त्यानंतर संबंधिताने जिल्हा परिषदेतून काढता पाय घेतला. दरम्यान, जिल्हा परिषदेतील या प्रकाराची दिवसभर चर्चा सुरू होती. असे असलेतरी कर्मचाऱ्यांशी अरेरावी करणाऱ्याला सुनावल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्याला कर्मचारी संघटनांच्यावतीने धन्यवाद देण्यात आले.