अधिकारी धावले कुसुंबीमुऱ्याला !
By Admin | Published: February 18, 2015 10:42 PM2015-02-18T22:42:40+5:302015-02-18T23:46:53+5:30
गार्इंचा मृत्यू : प्रशासनाला खडबडून जाग
कुडाळ : अज्ञात आजाराने कुसुंबीमुऱ्हा (ता. जावळी) येथे दुभत्या गाई दगावत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या दुर्गम गावाला अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांना तातडीने पशुवैद्यकीय सुविधा देण्यात येईल, असे आश्वासन पंचायत समितीचे सभापती सुहास गिरी यांनी दिले.
कुसुंबीमुऱ्हा येथे १८ जनावरे अज्ञात आजाराने दगावल्याची बातमी ‘लोकमत’च्या बुधवारच्या (दि. १८) अंकात प्रसिद्ध झाली होती. या आजाराचे नाव ‘बोटॅलिजम’ (हळव्या) असे असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. डी. कदम यांनी दिली. गेल्या एक महिन्यापासूनच कुसुंबीमुऱ्हा येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना दुर्धर आजाराने त्रस्त केले आहे. गार्इंचे मागचे पाय निकामी होऊन ती बसून राहते आणि चोवीस तासांत तिचा मृत्यू होतो, असे आढळून आले होते. याविषयीचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. कोणाची किती जनावरे दगावली, याचीही माहिती दिली होती. या गावात एका पाठोपाठ एक अशा १८ गार्इंचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांना पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची कोणतीही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक हानी झाली. तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांपुढे कैफियत मांडूनही याकडे लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष होता.
जनावरे दगावत असताना पशुसंवर्धन विभागाने कागदी घोडे नाचविले, असे शेतकरी शशिकांत आखाडे यांनी सांगितले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)++
कुसुंबीमुऱ्हा येथे झालेल्या प्रकाराची माहिती मी तालुका पशुसंवर्धन विस्तार अधिकाऱ्यांकडून मागविली असून, दिरंगाईस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल.
- डॉ. आर. डी. कदम,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
लोकमतचा
दणका