अधिकारी येतील जातील; पण गावपण टिकावं..! - रोहिणी शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:36 PM2020-03-16T18:36:28+5:302020-03-16T18:38:36+5:30
मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाराच्या बाहेर जाऊन मला अपात्रतेबाबत नोटीस दिली. त्यात चुकीची भाषाशैली वापरली. त्यामुळे सोमवार,दि. १६ पासून मी नगरपरिषदेसमोर उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत मी उठणार नाही. - रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, क-हाड
प्रमोद सुकरे ।
क-हाड : क-हाड शहरातील अतिक्रमण काढलेच पाहिजे. याला कोणाचा विरोध असण्याची गरज नाही; पण शहरात ज्या पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली गेली. ती पद्धत चुकीची आहे. पूर्व सूचना न देता, नोटीस न देता केलेल्या कारवाईमुळे नागरिकांची नाहक नाराजी ओढावली आहे. अधिकारी येतील-जातील; पण गावाचं गावपण टिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे, असे मत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी व्यक्त केले.
प्रश्न : मुख्याधिकारी व तुमच्यात नेमका काय वाद आहे?
उत्तर : ते सन्मानजनक वागणूक कोणालाच देत नाहीत. त्यांचं एकंदरीत वागणंच चुकीचं आहे. महिलांशी कसं बोलावं हे त्यांना कळत नाही. पालिकेत नगराध्यक्षा म्हणून विश्वासात घेत नाहीत, मनमानी करतात. अशा माणसाशी वाद नाही होणार तर काय होणार?
प्रश्न : पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम थांबली आहे काय?
उत्तर : तसे काही नाही. यापुढे नागरिकांनी विश्वासात घेऊन कायद्याच्या चाकोरीतून नोटिसा देऊन ही मोहीम आम्ही राबवणार आहोत. त्याबाबत विशेष सभेमध्येही चर्चा झाली आहे.
प्रश्न : घरकूल योजनेत राहणाºया महिलांनी बोंबाबोंब आंदोलन का केले?
उत्तर : वास्तविक, तेथे राहणाºया लोकांनी तेथील दयनीय अवस्था आम्हा साऱ्यांसमोर मांडली आहे. आमचे आरोग्य सभापती महेश कांबळेही वेळोवेळी त्याबाबत आग्रही राहिले आहेत. तेथे प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे. पण ते काम करण्याला मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुय्यम स्थान देतात. हे लोकांच्याही लक्षात आले आणि म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. आता मात्र आम्ही त्या कामाला लगेच गती देऊ.
... त्याचे श्रेय लोकसहभागाला!
कºहाड शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील काम निश्चितच चांगले आहे. त्याची पोहोच पावतीही गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्याला मिळाली आहे. पण त्याचे सर्व श्रेय लोकसहभागाला जाते. आम्ही सर्वजण फक्त निमित्त मात्र आहोत. नागरिकांनी यापुढे असेच सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुनर्वसनासाठी सकारात्मक
शहरातील हातगाडा चालकांच्य पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या सतरा दिवसांपासून प्रलंबित असला तरी आम्ही त्याबाबत सकारात्मक आहोत. बहुसंख्य हातगाडा व्यावसायिक हे अंत्यत गरीब आहेत आणि त्यांचे पुनर्वसन होणे ही बाब गरजेचे आहे. त्यांच्याशी एक-दोनदा चर्चा झाली आहे. त्यातून काही प्रमाणात मार्ग निघाले आहेत. त्याची अंमलबजावणी प्रशासन गतीने करेल.