स्वातंत्र्य सैनिक बाबुमियाँ फरास यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 08:26 PM2018-08-25T20:26:01+5:302018-08-25T20:27:12+5:30
सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ आझाद हिंद सैनिक व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी इब्राहिम उमर ऊर्फ बाबुमियाँ फरास यांच्या पार्थिवावर सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तानमध्ये शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आले.
सातारा : सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ आझाद हिंद सैनिक व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी इब्राहिम उमर ऊर्फ बाबुमियाँ फरास यांच्या पार्थिवावर सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तानमध्ये शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आले. त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलाने बिगुलाची शोकधून वाजवून मानवंदना दिली.
बाबुमियाँ फरास यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. अंत्यदर्शन घेणाऱ्यांमध्ये राजघराण्यातील शिवाजीराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विक्रमराजे भोसले, अक्कामहाराज, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, सुधीर धुमाळ, शकील बागवान, प्रकाश बडेकर यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या नेतृत्वाखालील शनिवारी सकाळी पोलिसांनी शोकधून वाजवून मानवंदना दिली. सारंगकर यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून पार्थिवावर तिरंगा ध्वज लपेटला. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू झाली.
अंत्ययात्रा गेंडामाळ कब्रस्तानमध्ये पोहोचल्यावर तेथे तहसीलदार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक बेंदरे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पोलीस दलाने मानवंदना दिली. बंदुकीच्या तीन फैरी झाडल्या. पोलिसांनी पार्थिवावरील तिरंगा ध्वज बाबुमियाँ फरास यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. हा ध्वज कुटुंबीयांच्या तर्फे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वीकारला. बाबुमियाँ यांच्याविषयीआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजय मांडके यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी अच्युतराव जाधव, प्रकाश बडेकर, अस्लम तडसरकर, विजय निकम, शिरीष जंगम, रफिक बागवान, दत्तात्रय कारंडे आदी उपस्थित होते.