पवनचक्कीला टाळे ठोकताच अधिकारी ‘जमींपर’!
By Admin | Published: October 25, 2015 09:16 PM2015-10-25T21:16:56+5:302015-10-25T23:50:14+5:30
कडवे खुर्द : ग्रामपंचायतीला चुना लावणाऱ्या कंपन्या ताळ्यावर; हद्दीप्रमाणे कर देण्याचे आश्वासन
तारळे : कडवे खुर्द, ता. पाटण ग्रामपंचायतीने कर चुकवेगिरी करणाऱ्या तीन पवनचक्क्यांना टाळे ठोकले, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर मागणीला केराची टोपली दाखवत मुजोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गटविकास अधिकाऱ्यांसमोर जाऊन नकाशाच्या हद्दीप्रमाणे ग्रामपंचायतीला कर देण्याचे आश्वासन द्यावे लागले.
भूमिअभिलेख कार्यालयातून मिळालेल्या सर्व्हेनंबर व गटनंबरच्या चुकीच्या नकाशाचा आधार घेत व अन्य ग्रामपंचायतीला कर देत असल्याचे खोटे सांगून सुमारे पंधरा वर्षांपासून कडवे खुर्द ग्रामपंयातीला कर देण्यासाठी तीन पवनचक्क्या टाळाटाळ करत होत्या. अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही पवनचक्की कंपन्यांची मुजोरी चालूच होती.
उपसरपंच भाऊराव सपकाळ यांना याबाबत शंका आल्याने गेल्या चार वर्षांपासून त्यांनी पाठपुरावा सुरू केल्यावर गावच्या सर्वे नंबरच्या व गटाच्या नकाशातील चूक त्यांच्या निदर्शनास आली. ती चूक दुरुस्त करण्यासाठी भूमिअभिलेखच्या पाटण व सातारा कार्यालयाकडे दाद मागितली. तरीही दोन्ही ठिकाणी त्यांची निराशा झाली. २००६ मध्ये झालेल्या वादानंतर कंपनीने त्या क्षेत्राची मोजणी केल्यावर कडवे खुर्दच्या हद्दीतच पवनचक्क्या असल्याचे स्पष्ट झाले. पण, चुकीच्या नकाशाचाच धागा पकडून पवनचक्क्यांची मुजोरी सुरूच आहे.
अनेक प्रकारचे अर्ज विनंत्या करूनही कंपनी सहकार्य करत नसल्योन वैतागलेल्या ग्रामस्थांनी टाळे ठोकण्याचा इशारा दिला. तरीही डोळेझाक करणाऱ्या कंपनीला ताळ्यावर अणण्यासाठी ग्रामपंचायतीने तिन्ही पवनचक्क्यांना टाळे ठोकले. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच चुकीच्या आधारावर हवेत असणारे अधिकारी ताळ्यावर आले व त्यावर तोडगा काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांसमोर येण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)
नाक दाबल्यावर तोंड उघडले !
सर्व्हे नंबर व गट नंबरच्या नकाशाच्या हद्दी चुकीच्या दाखविल्या गेल्याचे त्याचा गैरफायदा घेत तीन पवनचक्क्या ग्रामपंचायतीला कर देण्यास टाळत होत्या. अर्ज विनंत्यांना केराची टोपली दाखविणाऱ्या कंपनी विरोधात ग्रामस्थांमध्ये रोष होता. इशारा देऊनही न समजणाऱ्या कंपन्यांना ताळ्यावर आणण्यासाठी ग्रामस्थांनी अखेरचे पाऊल उचलून टाळे ठोकल्यानंतर कंपनीला जाग आली. त्यामुळे नाक दाबल्यावर तोंड उघडले असे ग्रामस्थांनी सांगितले.