अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडायचे नाही!
By Admin | Published: September 11, 2015 12:45 AM2015-09-11T00:45:33+5:302015-09-11T00:46:00+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ३० सप्टेंबरपर्यंत मंजूर रजेशिवाय कुठेही जायचे नाही
लोकमतचा प्रभाव
सातारा : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हेडक्वॉर्टर न सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ‘दुष्काळप्रश्नी अधिकाऱ्यांना घरातून बाहेर काढा’ असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेत असंख्य अधिकारी सुटीला गावाकडे असतात, हे निष्पन्न झाले. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या सूचना केल्या आहेत.
३० सप्टेंबरच्या आधी कोणीही मंजूर रजेशिवाय सुटीवर जायचे नाही, गेल्यास संबंधितावर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी अश्विन मुदगल यांनी दिला आहे.
जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याने भयानक दुष्काळ पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये पावसाअभावी खरीप पिके वाया जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जनावरांना चाराही उपलब्ध नाही. प्रशासनाने १५८ दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचा
दावा केला असला तरी फलटण, माण, खटाव तालुक्यांत प्रचंड चारा टंचाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सजग राहण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)