लाल दिव्याच्या गाडीतील अधिकाऱ्यांचेही माण तालुक्यात श्रमदान, ७५ तालुक्यांत वॉटर कप स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 08:10 PM2018-05-02T20:10:00+5:302018-05-02T20:10:00+5:30
दहिवडी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून माण तालुक्यात वॉटरकप स्पर्धेंतर्गत महाश्रमदानाचे आयोजन केले होते.
दहिवडी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून माण तालुक्यात वॉटरकप स्पर्धेंतर्गत महाश्रमदानाचे आयोजन केले होते. तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अ आणि ब श्रेणीतील व मंत्रालयीन विभागातील लाल दिव्यातील २०० अधिकाऱ्यांनी माणच्या मातीत श्रमदान केले.
राज्यातील ७५ तालुक्यांत वॉटर कप स्पर्धा सुरू असून, तब्बल १ लाख ५० हजार लोक तर माणमध्ये दररोज २५ हजार लोक श्रमदान करीत आहेत. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाश्रमदानाचे आयोजन केले होते. त्याला तालुकावासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. तब्बल ४० हजार लोक श्रमदान करीत होते. माण तालुक्यातील लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी ५ हजारांपेक्षा जास्त लोक माण तालुक्यात परगावातून आले होते. माणच्या भूमितील असलेले प्रथम, द्वितीय श्रेणीतील अधिकारी व मंत्रालयीन कक्ष अधिकारी असे लाल दिवा असणारे तब्बल २०० अधिकारी कुटुंबासह तालुक्यात श्रमदान करीत होते. अनभुलेवाडी, बिदालकर मंडळीनी गेल्यावर्षी महाश्रमदान राबवले होते. ही मंडळी वेगवेगळ्या गावात जाऊन श्रमदान करीत होती. मुंबई, पुणे, महाबळेश्वर, जावळी, बारामती, सांगली, तासगाव, रत्नागिरी येथील अनेकांनी जलमित्र म्हणून नोंदणी केली होती. त्यांनीही तालुक्यात श्रमदान केले.
शिवसेनेचे पुणे, मुंबईतील पदाधिकारी, अॅकॅडमी, पतसंस्थांचे कर्मचारी, डॉक्टर, शिक्षक यांनी तालुक्याच्या श्रमदानात भाग घेतला. यावेळी प्रभाकर घार्गे यांनी कळस्करवाडी व गाडेवाडी या गावाला जिल्हा बँकेकडून प्रत्येकी ७५ हजारांचा धनादेश दिला.