अधिका-यांच्या कानी टोल मुक्ती गीत! : गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 01:54 PM2019-11-26T13:54:53+5:302019-11-26T13:55:55+5:30
या चळवळीने अनोख्या मार्गाने आंदोलन करत प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. टोल विरोधी जनता चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज राज्यकर्त्यांसह प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात ‘लोकमत’ आघाडीवर राहिला. यामुळे महामार्गावरील रस्ते दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
सातारा : महामार्गावरील असुविधा व्हिडिओ गीताच्या स्वरूपात व्हायरल झाले आहे. सोशल मिडियावर असलेले हे गीत अधिकाºयांच्या कानी पडावे यासाठी टोलविरोधी जनता चळवळीचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. अधिकाºयांकडे जावून हे गीत त्यांना दाखवून महामार्ग असुविधांची तिव्रता दर्शविण्यात येत आहे.
महामार्गावरील असुविधां विरोधात आवाज उठविण्यासाठी सोशल मिडियावर ‘टोल विरोधी जनता’ या नावाने चळवळ सुरू करण्यात आली. या चळवळीने अनोख्या मार्गाने आंदोलन करत प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. टोल विरोधी जनता चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज राज्यकर्त्यांसह प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात ‘लोकमत’ आघाडीवर राहिला. यामुळे महामार्गावरील रस्ते दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
सुरक्षित महामार्ग देण्यासाठी प्रशासन कार्यरत झाल्यानंतर आता चळवळीने मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात या मागणीकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. खड्डेमुक्त महामार्ग करण्याचे काम सर्वत्र सुरू झाल्यानंतर आता महामार्गावरील मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.
चळवळीच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांची भेट घेवून त्यांना हे गाणे ऐकवले. या गाण्याच्या चित्रीकरणाचे कौतुक करून राऊत यांनी महामार्ग दुरवस्थेबाबत तातडीने प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे चळवळीच्या कार्यकर्त्यांना सांगिंतले. यावेळी रवींद्र नलवडे, महेश महामुनी, महारूद्र तिकुंडे, महेश पवार, रोहित सपकाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकार रस्ता चांगला कर...!
टोल विरोधी जनता चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते महेश पवार यांनी ‘सरकार रस्ता चांगला कर नाहीतर टोल बंद कर.. आत उठ सातारकर त्याच्यासाठी तुच काही तर कर’ हे गीत तयार केले आहे. अडीच मिनिटाच्या या गीतात पुणे- सातारा महामार्गावरून प्रवास करणाºयांच्या यातना कथित करण्यात आल्या आहेत. या गाण्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल झाला असून तोही समाज माध्यमांत चांगलाच पाहिला जात आहे. या व्हिडिओमध्ये सामान्य सातारकरांनी भूमिका बजावल्या आहेत
टोल विरोधी जनता ही चळवळ संवेधानिक मार्गाने आपल्या मागण्या मांडत आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा गांधीगिरीचा मार्ग अवलंबणं याला आम्ही प्राधान्य देणार आहे. या गाण्याच्या माध्यमातून आम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहोत. सार्वजनिक आंदोलन करताना यापूर्वी कधीही कोणीही असा प्रयोग केला नाही. शासकीय यंत्रणेला जागृत करण्यासाचा आमचा हा एक प्रयत्न आहे.
- महेश पवार, गीत संकल्पक