मतदान यंत्रणा घेऊन अधिकारी गावोगावी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:33 AM2021-01-15T04:33:28+5:302021-01-15T04:33:28+5:30
वाई : ग्रामपंचायत निवडणुकीचा फिवर जोरात असून गावकारभारी होण्यासाठी रिंगणात उतरलेले उमेदवार कामाला लागले आहेत. प्रशासनही सज्ज झाले ...
वाई : ग्रामपंचायत निवडणुकीचा फिवर जोरात असून गावकारभारी होण्यासाठी रिंगणात उतरलेले उमेदवार कामाला लागले आहेत. प्रशासनही सज्ज झाले असून गुरुवारी मकर संक्रांत असूनही महिला निवडणूक कर्मचारी लवकर ववसा घेऊन हजर होते. मतदान यंत्रणा घेऊन अधिकारी गावोगावी रवाना झाले आहेत.
वाई तहसील कार्यालयाच्या बाहेर विभागानुसार व्यवस्था केली होती. यापूर्वीच प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, नायब तहसीलदार गीतांजली गरड यांनी वाई तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या पार्किंगमध्ये दीडशे मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशीचा कामकाज पाहणी करणाऱ्या अंदाजे पाचशे अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदानादिवशी येणाऱ्या अडचणी विषयांच्या मार्गदर्शनासाठी एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले होते.
यामध्ये प्रांताधिकारी, तहसीलदारांनी योग्य मार्गदर्शन करून वाई तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीसाठी प्रांत व तहसील कार्यालय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती दिली आहे. वाई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन स्थानिक गावपुढारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन गावकी, भावकी, घराघरातील नातेसंबंधामध्ये कटुता येऊ नये व गावाची कायदा, सुव्यवस्था बिघडू नये, दंगे मारामाऱ्या टाळण्यासाठी तब्बल १९ ग्रामपंचायती बिनविरोध केल्या.
हा नवीन आदर्श या १९ गावांतील लोकांनी घालून दिला आहे. या ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी १५० मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहेत व या केंद्रांवर एकूण १५० मतदान मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. उपलब्ध मशीनमध्ये मतदान केंद्रावर अचानक बिघाड झाल्यास त्याऐवजी दुसऱ्या मशीन तातडीने पुरविण्यासाठी ५० राखीव मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली आहेत.
प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई. १ पोलीस असे पथक तसेच १५ राखीव टीम कार्यरत आहेत. मतदान झाल्यावर यंत्रे सीलबंद करून बंदोबस्तात वाई येथील नवीन तहसीलदार कार्यालयात ठेवण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे या दोघांनी संवेदनशील गावांत मतदानाच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. याबरोबर राज्य राखीव दलाची तुकडीही मागवण्यात आलेली आहे.
चौकट :
फिरती आरोग्य पथके
तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त असून सर्व मतदान केंद्रांवर कर्मचारी रवाना झाले आहेत. प्रत्येक केंद्रावर कोरोनाच्या नियमानुसार नियोजन केले आहे. आरोग्य विभागाकडून फिरत्या आरोग्य पथकांची नियुक्ती केली असून सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे,’ अशी माहिती रणजित भोसले यांनी दिली.