जिल्हा परिषदेकडील अधिकाऱ्यांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:40 AM2021-07-28T04:40:17+5:302021-07-28T04:40:17+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सूचना : पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मुसळधार पाऊस आणि उद्भवलेली पूरपरिस्थिती ...
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सूचना : पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मुसळधार पाऊस आणि उद्भवलेली पूरपरिस्थिती पाहता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडू नये, अशी सूचना केली आहे.
सद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त स्वरूपात आहे. पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये काही ठिकाणी पूरपरिस्थितीदेखील निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या घरांची पडझड झाल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येत आहे. पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली इत्यादी तालुक्यांमध्ये अतिवृष्टी असून पूरपरिस्थिती, जीवितहानी, तसेच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव यासारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर ही सक्त सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयातील सर्व खातेप्रमुख, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, तालुका स्तरावरील कार्यालयप्रमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेशात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे अत्यंत निकडीच्या कारणाशिवाय रजेवर जाण्यासदेखील मनाई केली आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती, जीवितहानील तसेच साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी बाबींच्या अनुषंगाने तात्काळ अहवाल सादर करण्याबाबतदेखील सक्त सूचना संबंधित आदेशात देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वाढता पाऊस आणि पूरपरिस्थिती, तसेच होणारे नुकसान या पार्श्वभूमीवर जनतेला योग्यवेळी योग्य ती मदत तातडीने मिळावी. योग्य ते नियोजन तत्काळ करता यावे. यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण शासकीय यंत्रणा जनतेच्या सर्वांगीण मदतीसाठी तत्पर आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.