अरे बापरे... एक किलो टोमॅटोची तीन रुपयांनी विक्री अन् वाहतुकीला जाताय चार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:29+5:302021-07-11T04:26:29+5:30

दहिवडी : माण तालुक्यात टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात उत्पादक गावे असणारे मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या ...

Oh my gosh ... a kilo of tomatoes sells for three rupees and four rupees for transportation | अरे बापरे... एक किलो टोमॅटोची तीन रुपयांनी विक्री अन् वाहतुकीला जाताय चार रुपये

अरे बापरे... एक किलो टोमॅटोची तीन रुपयांनी विक्री अन् वाहतुकीला जाताय चार रुपये

Next

दहिवडी : माण तालुक्यात टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात उत्पादक गावे असणारे मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा फटका बसला आहे. बाजार समितीत अवघे तीन रुपये किलो दराने टोमॅटो विक्री होत असताना वाहतुकीचा खर्च मात्र चार रुपये करावे लागतात. त्यामुळे अनेकांनी फड सोडून दिले आहेत.

या भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण टोमॅटोवर अवलंबून असते. मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द या गावातील जवळपास पाचशे एकर क्षेत्रावर आयुष्यमान, अनसल, आर्यमान, जवाहर, विजेता या जातीच्या टोमॅटोची दरवर्षी पाडव्याला लागवड होत असते. सोलापूर, बेळगाव, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई, कोल्हापूर या बाजारपेठेत टोमॅटो येथून पाठवले जातात. रोज २० ते २५ लहान मोठी गाडी भरून माल जातो. त्यामुळे दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात कोट्यवधीची उलाढाल होत असते. या व्यवसायावर मजूर वाहन व्यावसायिक व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असते. गेल्यावर्षी अचानक लॉकडाऊन पडल्याने बाजार समिती बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोचे फड आहे तसे सोडावे लागले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. बाजारसमिती सुरू असल्या तरी मालाचा उठाव होत नाही. दिल्ली, हैदराबाद या परिसरातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने दराने कंबरडे मोडले आहे. वीस किलोचे कॅरेट ६० रुपयांना आणि वाहतूक खर्च ८० रुपये येतो. त्यामुळे पदरचे पैसे भरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

गेल्या वर्षीचा तोटा यावर्षी भरून निघेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले. कोकणामधून बांबू, तार, सुतळी आणून एकरी एक लाखापेक्षा जास्त खर्च केला. मात्र सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी यावर्षीही बागा जागेवरच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

चौकट

आम्हाला सलग दुसऱ्या वर्षी टोमॅटोची बाग सोडावी लागली. शासन फळबागाचा विमा उतरवते इतर पिकांचीही भरपाई देते मात्र नाशवंत टोमॅटोसाठी शासनाचे कसलेच धोरण नाही. ज्यांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे होऊन किमान भरपाई दिली पाहिजे तरच शेतकरी सावरू शकेल अन्यथा कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय नाही, अशी भीती मलवडीतील शेतकरी दत्तात्रय मगर यांनी व्यक्त केली.

चौकट

टोमॅटो उत्पादनामुळे वाहतूकदारांना दोन महिने चांगला व्यवसाय मिळतो. यंदा मात्र दर नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांने टोमॅटो जागेवरच सोडून दिले आहेत. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर झाला आहे.

- लालासाहेब घार्गे गाडेवाडी

फोटो १०दहिवडी-टोमॅटो

माण तालुक्यातील मलवडी येथे टोमॅटोला चांगला दर नसल्याने शेतकरी तुकाराम मगर यांनी बाग सोडून दिली आहे.

Web Title: Oh my gosh ... a kilo of tomatoes sells for three rupees and four rupees for transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.