जळगाव येथे ऑईल मिलला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:33+5:302021-08-18T04:46:33+5:30
कोरेगाव : जळगाव, ता. कोरेगाव येथील सुयोग ऑईल मिलला सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे १ ...
कोरेगाव : जळगाव, ता. कोरेगाव येथील सुयोग ऑईल मिलला सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे १ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या पंचनाम्यामध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे नमूद केले आहे. जळगावच्या हराटी नावाच्या परिसरात असलेल्या भानुदास रघुनाथ बागाव यांची सुयोग ग्राऊंडनट ॲण्ड ऑईल मिल आहे. सोमवारी सकाळी ११. ३० च्या सुमारास मिलचे कामकाज बंद करून भानुदास बागाव हे सहकुटुंब वाई तालुक्यातील नातेवाइकांकडे मुक्कामी गेले होते. रात्री २.१५ च्या सुमारास बंधू दिलीप रघुनाथ बागाव यांनी मोबाइलवरून मिलला आग लागल्याचे कळविले, त्यानंतर पहाटे ४.३० च्या सुमारास बागाव कुटुंबीय जळगावमध्ये दाखल झाले. मध्यरात्री उशिरा आग लागली. काही तासातच आगीने रौद्र रूप धारण केले.
बागाव कुटुंबीय, सातारा व रहिमतपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. याप्रकरणी महसूल विभागाचे सातारारोडचे मंडलाधिकारी राजेंद्र जाधव व तलाठी मोहन खाडे यांनी जळिताचा पंचनामा केला आहे. या आगीत सुमारे १ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.
फोटो : १६ जळगाव आग
जळगाव (ता. कोरेगाव) येथील ऑईल मिलचे आगीत मोठे नुकसान झाले.