इंधन दरवाढीमुळे जुन्या दुचाकींनी धरली भंगाराची वाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:26+5:302021-07-17T04:29:26+5:30
आदर्की : इंधन दरवाढ आवाक्याच्या बाहेर गेल्याने जुन्या पेट्रोल खाणाऱ्या दुचाकीला ग्राहक मिळत नसल्याने ग्रामीण भागात अशा दुचाकी भंगारात ...
आदर्की : इंधन दरवाढ आवाक्याच्या बाहेर गेल्याने जुन्या पेट्रोल खाणाऱ्या दुचाकीला ग्राहक मिळत नसल्याने ग्रामीण भागात अशा दुचाकी भंगारात विकत असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात वीस वर्षांपूर्वी दुचाकी दारात असणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण समजले जात होते. त्यामुळे बँक, पतसंसस्था, सोसायटी, फायनान्स आदींच्या माध्यमातून अर्थसाह्य घेऊन दुचाकीची खरेदी केली जात होती. त्यावेळी गाड्यांना मायलेज होते. पेट्रोलमध्ये भेसळही कमी प्रमाणात होती. लीटरचा दरही १७ ते १८ रुपये होता. त्यामुळे गाड्या फिरवणे परवडत होते. सध्या ऑईल, स्पेअरपार्ट, टायरच्या किमतीही वाढल्या आहेत. आता पेट्रोल पंपावर पेट्रोल १०७ रुपये लीटर तर गावोगावी मिनी पेट्रोल पंपावर १२० ते १३० रुपये लीटर विकले जाते. त्यामुळे जुन्या गाड्या फिरवणे परवडत नसल्याने व जुन्या गाड्या विकत घेण्यासाठी ग्राहक मिळत नाहीत तर कोरोना महामारीने ग्रामीण भागातील आर्थिक बजेटही कोलमडले आहे. त्यामुळे घरातील पत्रे, पाईप, जुनी भांडी, डबे, आदी भंगाराबरोबर दुचाकीही भंगारात विकत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
(चौकट)
ग्रामीण भागात दुचाकी दारात असणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण होते. आता चारचाकी दारात आली तरी दुचाकी पहिली लक्ष्मी म्हणून दारात उभी असते. कधीतरी फेरफटका मारण्यासाठी वापरत असत; पण इंधन व स्पेअरपार्टच्या महागाईमुळे दुचाकी भंगारात विकल्या जात आहेत.
१६ आदर्की
फोटो : ग्रामीण भागात इंधन दरवाढीमुळे दुचाकी भंगारात विकण्यासाठी नेल्या जात आहेत.