दहा लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:58 PM2018-08-28T22:58:47+5:302018-08-28T22:58:51+5:30
पाचवड : नोटाबंदीमुळे रद्द झालेल्या जुन्या चलनी नोटा बदलून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बाजीराव अण्णा मोरे (वय ५०, रा. राणगेघर, ता. जावळी) याला पाचवड येथील बैल बाजारतळावर भुर्इंज पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दहा लाख रुपयांच्या जुन्या चलनी नोटा पोलिसांनी जप्त केल्या असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बाजीराव मोरे याच्याकडील जुन्या चलनी नोटा घेऊन त्या बदल्यात नव्या घेण्यासाठी काहीजण वाई तालुक्यातील पाचवड येथे सोमवारी आठवडे बाजारात येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून भुर्इंज पोलिसांना मिळाली. त्यानुसार भुर्इंजचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे बापूराव धुरगुडे, जितेंद्र शिंदे, प्रवीण कांबळे, प्रसाद दुदुस्कर, सचिन ससाणे यांच्या पथकाने सोमवारी रात्री आठच्या सुमारास पाचवड बैल बाजारात सापळा लावला.
यावेळी बाजीराव मोरे हा दुचाकीवरून तेथे आला. त्याच्याकडे दहा लाख रुपयांच्या जुन्या नोटा असलेली बॅग व दुचाकी पोलिसांनी जप्त केली. या नोटा नेमक्या कोणाकडून आणून तो कोणाला देणार होता, हे अद्याप समोर आले नाही. चौकशीदरम्यान मोरे हा पोलिसांना वेगवेगळी उत्तरे देत आहे. या नोटा मुंबर्इंत कचरा कुंडीत सापडल्या तर कधी बांधकाम व्यावसायिकाच्या हस्तकाकडून आल्याचे तो सांगत आहे. न्यायालयापुढे त्याला हजर करण्यात आले असता चौदा दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
एक हजाराच्या
तीन नोटा कमी..
दहा लाख रुपयांच्या जुन्या नोटा पंचनामा करून मोजत असताना या नोटांमध्ये एक हजार रुपयांच्या तीन नोटा कमी असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पंचनाम्यात ९ लाख ९७ हजार रुपये किमतीच्या नोटांचा समावेश आहे.