जुनी पेन्शन.. मिटलं टेन्शन; शासनस्तरावर सकारात्मक चर्चा, साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष
By नितीन काळेल | Published: March 20, 2023 06:34 PM2023-03-20T18:34:09+5:302023-03-20T18:34:39+5:30
संपकाळात कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर...
सातारा : ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशी घोषणा देत राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी संपावर गेले होते. मात्र, संपाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारपासून वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी कामावर येणार आहेत. तर साताऱ्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी मागण्यांचा विचार झाल्याने एकच जल्लोष केला.
राज्यात २००५ च्या नोव्हेंबर महिन्यानंतर राज्यातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी कर्मचारी संघटनांच्या वतीने वारंवार आंदोलने करण्यात आली. मात्र, त्यांच्या पदरी काहीच पडले नव्हते. तसेच वेतनातील त्रुटीचाही मुद्दा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे जुनी पेन्शन सुरू करणे, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे आणि सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, समान काम आणि समान पदोन्नती टप्पे, बदल्यांतील अन्यायकारक धोरण रद्द करणे, सुधारित आकृतिबंधात लिपिकांची पदे वाढविणे आदी मागण्याांसाठी संप सुरु करण्यात आला होता.
मागील मंगळवारपासून संप सुरू झाला होता. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत सुमारे सहा हजार कर्मचारी संपात सहभागी झाले होते. तर पाच हजार कर्मचारी कामावर होते. संप सुरु झाल्यापासून कर्मचारी आक्रमक झाले होते. तसेच दररोज निदर्शने, विविध प्रकारची आंदोलने करण्यात येत होती. याची तीव्रता वाढत चाललेली. असे असतानाच सोमवारी संपाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मकता दाखवली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयानंतर सातारा जिल्हा परिषदे वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तसेच जुन्या पेन्शनबाबत विचार झाल्याबद्दल जल्लोष केला. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संप मागे घेतल्याने मंगळवारपासून कर्मचारी कामावर येणार आहेत.
चार दिवस कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर...
जिल्हा परिषदेचे कर्मचारी संपावर होते. त्यावेळी अधिकारीच फक्त जिल्हा परिषदेत कार्यरत होते. तर जिल्हा परिषदेत कामावर येणाऱ्या लोकांना अडचणी येऊ नयेत म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना विविध विभागाची जबाबदारी दिली होती. संबंधितांनी चार दिवस कामकाज पाहिले. तसेच अधिकाऱ्यांशी समन्वय साधत कामे केली.