शामगाव घाटात रात्री मद्यप्यांकडून ‘ओली पार्टी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:18+5:302021-01-09T04:32:18+5:30
मद्यपी थेट शिवारात तसेच घाटात रस्त्याकडेला बसून मद्यपान करीत आहेत. त्यानंतर राहिलेल्या काचेच्या रिकाम्या बाटल्या व ग्लास तसेच टाकून ...
मद्यपी थेट शिवारात तसेच घाटात रस्त्याकडेला बसून मद्यपान करीत आहेत. त्यानंतर राहिलेल्या काचेच्या रिकाम्या बाटल्या व ग्लास तसेच टाकून देत आहेत. त्यामुळे घाटाच्या परिसरात फिरत असलेल्या जनावरे तसेच शेतकऱ्यांना त्यापासून इजा पोहोचत आहे; तर दुचाकी गाड्यांच्या टायरचे नुकसान होत आहे. सायंकाळनंतर मद्यप्यांनी केलेल्या कार्यक्रमाचे परिणामी दुसऱ्या दिवशी सकाळी घाट परिसर तसेच शेतशिवारातील शेतकरी, दुचाकी वाहनधारकांना भोगावे लागत आहेत.
शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांच्या पायांना बाटल्यांच्या फुटलेल्या काचा लागून त्यांना गंभीर दुखापत होत आहेत. तसेच मोकळ्या फुटलेल्या बाटल्यांच्या काचा रस्त्यावर पडत असल्याने त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने जाऊन ती पंक्चर होत आहेत.
- चौकट
कचऱ्याचा प्रश्नही गंभीर
शामगाव घाटमार्गावर सध्या रस्त्याकडेला असलेले कचऱ्याचे ढीग धोकादायक बनले आहेत. कचऱ्याबरोबरच अनेक प्रकारच्या बाटल्या आता ढिगात सापडत असल्याने कुत्री तसेच चरण्यासाठी आलेली मोकाट जनावरे कचऱ्यातील अन्नपदार्थ खाताना कचऱ्यातून त्यांच्या पोटात काचा गेल्याने त्यांना दुखापत होत आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.