शिवजयंतीदिनी सातारा जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी किल्ले प्रतापगडावर जाणार, विविध कार्यक्रम होणार
By नितीन काळेल | Updated: February 18, 2025 19:33 IST2025-02-18T19:32:48+5:302025-02-18T19:33:28+5:30
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिवशी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पदाधिकारी किल्ले प्रतापगडावर जाण्याची परंपरा कायम असून यंदाही ...

संग्रहित छाया
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिवशी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पदाधिकारी किल्ले प्रतापगडावर जाण्याची परंपरा कायम असून यंदाही १९ फेब्रुवारीला अधिकारी जाणार आहेत. यानिमित्ताने प्रतापगडावर श्री भवानीमाता महापूजा, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभाही होणार आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने शिवजयंतीचा कार्यक्रम महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडावर करण्यात येतो. मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा पडलेली आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी जातात. पण, सुमारे तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट आहे. यामुळे अधिकारीच प्रतापगडावर जाऊन विविध कार्यक्रम पार पडतात. यावर्षीही जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रतापगडावर जाणार आहेत. यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत.
बुधवार, दि. १९ रोजी सकाळी सात वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते श्री भवानीमातेस अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर महापूजा होणार आहे. साडे नऊ वाजता कुंभरोशीचे सरपंच यांच्या हस्ते श्री भवानीमाता मंदिरासमोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. याचवेळी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ पूजन आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम याशनी नागराजन यांच्या हस्ते होईल. दहा वाजता ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताचे तसेच पोवाडा गायन आणि शालेय विद्याऱ्श्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तर दुपारी १२ वाजता किल्ले प्रतापगडावरच जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा होणार आहे. या सभेलाही सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.