महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी साताऱ्यात एक वही-एक पेन अभियान
By सचिन काकडे | Published: April 8, 2024 06:14 PM2024-04-08T18:14:13+5:302024-04-08T18:15:09+5:30
हारफुले घेऊन न येता वही आणि पेन सोबत आणावे व ते अर्पण करून अभिवादन करा
सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन सर्वत्र उत्साहात उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या दृष्टीने नवी पिढी घडवणारा, नवनिर्माणाचे स्वप्न मुलांच्या मन, मेंदू अन् मनगटात सळसळत ठेवणारा आहे. म्हणूनच यादिवशी ‘एक वही-एक पेन अभियान’ राबवून महामानवास अभिवादन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच साताऱ्यात अनेक वर्षे वास्तव्य राहिले आहे. त्यांचे शालेय शिक्षण येथेच झाले. त्यांच्या मातोश्री भीमाई यांचे निधन ही साताऱ्यात झालेय. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा हे ऋणानुबंध ऐतिहासिक आहेत. १४ एप्रिल रोजी या सर्व ऐतिहासिक घटनांना उजाळा मिळतो. शिवाय महामानवास अभिवादन करण्यासाठी जिल्ह्याच्या काेनाकोपऱ्यांतून अनुयायी साताऱ्यात येत राहतात. या महामानवाची ओळख ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ अशी आहे. म्हणूनच दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘एक वही-एक पेन’ या अभियानाच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन केले जाणार आहे. येणाऱ्या अनुयायांनी येताना हारफुले घेऊन न येता वही आणि पेन सोबत आणावे व ते अर्पण करून अभिवादन करावे.
जे अनुयायी वही, पेन घेऊन येतील त्यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे रविवार, दि. १४ एप्रिल रोजी अर्थात जयंतीदिनी सकाळी ९ ते रात्री १२ यावेळेत शैक्षणिक साहित्य स्वीकारले जाईल. शाळाबाह्य मुलांना शाळेत आणावयाचे असेल, त्यांना शिक्षणाची गोडी लावून शालेय शैक्षणिक चळवळ गतिमान करायची असेल तर या अभिनव उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अरुण जावळे यांनी केले आहे.