साताऱ्यातील करंजेत धुळवडीच्या दिवशी शिमगा, समाजकंटकांनी जाळले संसारोपयोगी साहित्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 01:22 PM2023-03-07T13:22:51+5:302023-03-07T13:23:15+5:30
आजतागायत हे समाजकंटक कसे सापडत नाहीत हाच प्रश्न उपस्थित
किरण दळवी
करंजे : करंजे गावात धुळवडीच्या दिवशीच शिमगा सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळाले. याचे कारण म्हणजे शिमग्याची पेटलेली होळी व होळीत जळणारे संसारातील साहित्य पाहून ग्रामस्थांनी समाजकंटकांना शिव्यांची लाखोली वाहली.
दरवर्षी करंजे गावातील भैरवनाथ पटांगणात होळी पेटविली जाते. संपूर्ण गावातील महिला होळीला नैवेद्य व पुरुष नारळ देण्यासाठी येतात. त्यामुळे याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. होळी सण आनंदात व शांतपणे चालू होता. परंतु पोलिस गेल्यानंतर अंधाराचा फायदा घेत काही युवकांनी लोकांच्या दारात ठेवलेली लाकडे, जळण, संसारोपयोगी साहित्य होळीत टाकले. आजतागायत हे समाजकंटक पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या वर्षीही समाजकंटकांकडून असेच कृत्य केल्याचे दिसून आले.
सकाळी सकाळी उठल्यावर काही नागरिकांना आपल्या वस्तू, सायकली होळीत टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांनी अशा समाजकंटकांना शिव्यांची लाखोली वाहिली. पोलिस यंत्रणा दरवर्षी येथे तळ ठोकून असते पण आजतागायत हे समाजकंटक कसे सापडत नाहीत हाच प्रश्न उपस्थित होत आहे.