satara news: खासदार रणजीतसिंह -आमदार रामराजे नाईक-निंबाळकर एकाच व्यासपीठावर, चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 03:33 PM2023-01-27T15:33:08+5:302023-01-27T15:35:25+5:30
एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार रणजितसिंह व आमदार रामराजे एकाच व्यासपीठावर प्रथमच फलटणकराना दिसले
नसीर शिकलगार
फलटण : केंद्रीय सडक परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या आज फलटण दौऱ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेतेमंडळींनी उपस्थिती दर्शविली. मात्र विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर कार्यक्रम स्थळी आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार रामराजे एकाच व्यासपीठावर प्रथमच फलटणकराना दिसले.
आज, फलटण शहरांमध्ये नितीन गडकरी यांच्या सत्कार सोहळ्याचे तसेच विविध कामांच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. बऱ्याच वर्षानंतर नितीन गडकरी हे फलटणमध्ये आल्याने त्यांच्या दौऱ्याची विशेष चर्चा सुरू झाली. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी भाजपा बरोबरच राष्ट्रीय व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तसेच यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात आज प्रथमच एकाच व्यासपीठावर खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर आ रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी उपस्थिती दर्शविल्याने फलटण शहरांमध्ये विविध चर्चाना उधाण आले.
कार्यक्रम सुरू होण्याअगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी नेतेमंडळी उपस्थित होते. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाल्यावर काय होणार याची अनेकांना उत्सुकता लागली होती. मंत्री नितीन गडकरी यांच्याशी रामराजे नाईक निंबाळकर यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे कार्यक्रम स्थळी येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्यांनी उपस्थिती दर्शवली. आज दिवसभर याच कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू होती.