पुणे-बेंगळुरु महामार्गावर कराड जवळ वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 11:30 AM2023-03-03T11:30:57+5:302023-03-03T11:31:24+5:30
दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचायला कसरत करावी लागत आहे
मानाजी धुमाळ
रेठरे धरण : पुणे बेंगळुरु आशियाई महामार्गावरकराड येथील कृष्णा हॉस्पिटल समोरील उड्डाणपूल पाडण्यासाठी पुलावरून वाहतूक व्यवस्था वळविण्यात आल्याने कराड शहरात जोडणाऱ्या सर्व सेवा रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊन कोलमडून गेली. यामुळे महामार्गावर दोन्ही दिशेला सुमारे दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला.
गेले महिनाभरापासून कराड येथील मुख्य प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपूल पाडण्याचे काम वेगात सुरू असून पुल पाडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. कृष्णा हॉस्पिटल समोरील पूल पाडण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याने, आज पासून या पुलावरून सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. पेठ कडून कराडकर कराडकडे जाणारी सर्व वाहने कोयना वसाहत मलकापूरच्या बाजू कडील सेवा रस्त्याने कोल्हापूर नाका ते पुढे कोयना पूल वारुंजी फाटा ते पुढे महामार्गावर वाहतूक वळविण्यात आले आहे. तर कराड कडून पेठच्या दिशेने जाणारी वाहने देखील कराड येथील कृष्णा हॉस्पिटल समोरील सेवा रस्त्याने वळविण्यात आली आहे. परिणामी सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चक्काजाम झाला आहे.
वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करत असताना महामार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी, पोलिस यंत्रणा ट्राफिक हवालदार, व महामार्गावरील संबंधित कंत्राटदार यांनी उपाययोजना करणे गरजेचे असताना, यामध्ये हयगय केल्याने अचानक पणे संपूर्ण महामार्गावर ट्राफिक जाम होऊन प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. गेले दोन दिवसापासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचायला कसरत करावी लागत आहे.