पुन्हा एकदा भडकल्या वणव्याच्या ज्वाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:08+5:302021-03-30T04:22:08+5:30
कुडाळ : जावळीच्या दऱ्याखोऱ्यातील वनसंपदेला वणव्याची दाहकता आव्हान देत आहे. शनिवारी रात्री पुन्हा एकदा वणव्याच्या ज्वालाग्नीत कुसुंबी पठारावरील ...
कुडाळ : जावळीच्या दऱ्याखोऱ्यातील वनसंपदेला वणव्याची दाहकता आव्हान देत आहे. शनिवारी रात्री पुन्हा एकदा वणव्याच्या ज्वालाग्नीत कुसुंबी पठारावरील निसर्गसंपदा धोक्यात आणली आहे.
होळीच्या पूर्वसंध्येला विकृत मनोधारणेच्या प्रवृत्तीने डोंगरमाथ्यावरील निसर्ग आगीच्या ज्वाळांनी पुरता वेढला होता. उंचच उंच आगीचे लोट आसमंतात दिसत होते. यामध्ये अधिवास करणाऱ्या अनेक जिवांचा शेवटच यात झाला.
वनविभागाने जागृती करूनही जो निसर्ग भरभरून देत आहे, यालाच नष्ट करण्यात काहींना धन्यता वाटू लागली आहे. याचा विचार होणार तरी कधी?
परंपरेच्या जोखडात अडकून विचित्र मनोधारणा किती दिवस बाळगायची. निसर्गाप्रती अशी उद्विग्न भावना ठेवून काहीच साध्य होणार नाही.
गेल्या महिनाभरात वणव्याच्या आगीने तालुक्यातील डोंगर, पठार भाग काळाकुट्ट होऊन बसला आहे. वसंतपंचमीच्या आगमनाने फुलणारा निसर्ग आता गाढ झोपी गेला आहे. आगीतही तग धरून राहिलेल्या झाडांवर काळ्या रंगांच्या पट्टीवर हिरवी पालवी फुटलेली दिसत आहे. याशिवाय दरवर्षी लाखो रुपये खर्च करून होणारी वृक्षलागवड या वणव्यात भस्मसात होऊन जाते. फुलण्याआधीच ही रोपे कोमेजून गेली आहेत.
ग्रामस्तरावर नागरिकांनी दक्षता घेऊन निसर्गाच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.