कालेच्या मैदानात आज दीड लाखाची कुस्ती
By admin | Published: November 18, 2014 09:00 PM2014-11-18T21:00:53+5:302014-11-18T23:31:57+5:30
शंभरहून अधिक लढती : तालुक्यातील कुस्तीप्रेमींची होणार गर्दी
काले : येथील व्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त बुधवारी दुपारी दोन वाजता कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे़ यावेळी शंभरपासून दीड लाखांपर्यंतच्या लढती होणार असल्याची माहिती संयोजक व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पै़ नाना पाटील यांनी दिली़ महाराष्ट्र केसरी दिवंगत पै़ संजय पाटील यांच्या स्मरणार्थ पै़ नाना पाटील मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे़ यावेळी शंभरपेक्षा जास्त लढती पाहायला मिळणार आहेत़ यामध्ये प्रथम क्रमांकाची दीड लाखाची कुस्ती दिल्लीचे पै़ मनप्रित सिंग विरूध्द उपमहाराष्ट्र केसरी पै़ नंदू आबदार यांच्यात होणार आहे़ एक लाखाची कुस्ती पै़ कांतीलाल जाधव विरूध्द पै़ जयकर खुडे (नारायणवाडी) यांच्यात होणार आहे़ तसेच शिवाजी मोहिते यांच्या वतीने पै़ सचिन बांगर विरूध्द पै़ बापू यमगर यांच्यात लढत होणार आहे़
यावेळी पै़ संभाजी कळसे व पै़ वसंत केचे, संदीप महारूगडे व राहुल मोरे, तन्वीर पटेल व वैभव शिंदे, मारूती खडंग व विकास पाटील, संग्राम पाटील व बाजीराव माने, पृथ्वीराज पाटील व सनी मालुसरे या मल्लांसह अन्य लढती रंगणार आहेत़
मैदानात महाराष्ट्र केसरी दिवंगत पै़ संजय पाटील यांच्या स्मरणार्थ विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे़ यामध्ये कुस्तीभूषण पुरस्कार पै़ जलिंदर चव्हाण यांना, कुस्ती निवेदक पुरस्कार शंकर पुजारी यांना, आदर्श पंच पुरस्कार पै़ आनंदा धुमाळ, कुस्ती संघटक पुरस्कार सुनील मोहिते यांना देण्यात येणार आहे़ सुवर्णपदक विजेते अमोल साठे यांचा सत्कार करण्यात येणार आहे़
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे या मैदानाचे मार्गदर्शक आहेत़
यावेळी आमदार पतंगराव कदम, शिवाजीराव नाईक, बाळासाहेब पाटील, अनंदराव पाटील, चंद्रदीप नरके, जयकुमार गोरे, मदनराव भोसले, डॉ़ मदनराव मोहिते, डॉ़ इंद्रजित मोहिते, राजेश पाटील, जयवंत जगताप, राजेंद्रसिंह यादव, हिंदकेसरी पै़ संतोष वेताळ, डबल महाराष्ट्र केसरी पै़ चंद्रहर पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत़ (वार्ताहर)