लंपी त्वचारोगाने एका जनावराचा मृत्यू, शेतकऱ्यांत धास्ती
By नितीन काळेल | Published: September 12, 2022 07:26 PM2022-09-12T19:26:51+5:302022-09-12T19:27:42+5:30
बाधित क्षेत्रात लसीकरण सुरु.
सातारा : जिल्ह्यात लंपी त्वचा रोग वाढत असून आतापर्यंत ६५ जनावरे बाधित झाली आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून बाधित क्षेत्र परिसरात जनावरांना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, लंपीमुळे शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे.
लंपी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. असे असलेतरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प असते. जिल्ह्यात सध्यस्थितीत जनावरांना आवश्यकतेनुसार लस आणि उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६५ जनावरे या रोगाने बाधित झाली आहेत. यामधील जनावरे ही २० रोगातून बरी झाली आहेत. तर एका जनावराचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले जनावर हे कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी येथील होते. खिलार बैल असणाऱ्या या जनावराचा सोमवारी मृत्यू झाला. जिल्ह्यातील लंपी रोगाचा हा पहिलाच बळी ठरला.
लंपी त्वचारोगाने बाधित जनावरांचा आकडा वाढू नये, यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी बाधित क्षेत्र परिसरात लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
१२ हजार जनावरांना लसीकरण...
जिल्ह्यात लंपी बाधित जनावरांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच कºहाड तालुक्यात या रोगाने बैलाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमिवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून बाधित क्षेत्रातील जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे १२ हजार जनावरांना लसीकरण झाले आहे.