बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्या युवकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:20 PM2019-06-20T12:20:46+5:302019-06-20T12:22:56+5:30
सातारा येथील पोवईनाक्यावर बेकायदा पिस्टल बाळगून फिरत असलेल्या रूपेश संजय वारे (वय २०, रा. कालगाव, ता.कऱ्हाड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जीवंत काडतूसे असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज जप्त केला.
सातारा : येथील पोवईनाक्यावर बेकायदा पिस्टल बाळगून फिरत असलेल्या रूपेश संजय वारे (वय २०, रा. कालगाव, ता.कऱ्हाड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जीवंत काडतूसे असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी, कऱ्हाड येथून साताऱ्याकडे येणाऱ्या बसमध्ये एक युवक पिस्टल व काडतूस घेऊन साताऱ्याकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार केले. या पथकाने सातारा बसस्थानक येथे मंगळवारी सायंकाळी सापळा लावला. परंतु आरोपी रुपेश वारे हा पोवईनाक्यावरच एसटीतून उतरला.
बस स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता, त्यामध्ये संबधित वर्णणाचा युवक सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी बसस्थानक व पोवईनाका परिसरात शोधाशोध सुरू केली. यावेळी हिरव्या रंगाचा टिशर्ट व निळ्या रंगाची पँट घातलेला तरूण त्यांना पोवईनाका परिसरात दिसला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने संजय वारे असे त्याचे नाव सांगितले. त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतूसे पोलिसांना सापडली. संजय वारे याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिध्देश्वर बनकर, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनिर मुल्ला, विक्रम पिसाळ, विशाल पवार, नीलेश काटकर, पंकज बेसके यांनी केली.