अपहरण करुन तरुणाचा खूनप्रकरणी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:45 AM2021-08-20T04:45:35+5:302021-08-20T04:45:35+5:30
फलटण : जिंती (ता. फलटण) येथून एका तरुणाचे अपहरण करून त्या तरुणाच्या खूनप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. त्याला ...
फलटण : जिंती (ता. फलटण) येथून एका तरुणाचे अपहरण करून त्या तरुणाच्या खूनप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. खूनप्रकरणी आणखी तीन संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत माहिती अशी की, जिंती येथून शकील अकबर शेख (वय २१, रा. विकासनगर जिंती) यांचे तीन अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. त्यानंतर मंगळवारी (दि. १७) होळ हद्दीत आपटे यांचे शेतामध्ये अपहरण झालेला शकील अकबर शेख या तरुणांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी विकास रघुनाथ आवटे (रा. जिंती ता. फलटण) यास पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
विकास रघुनाथ आवटे हा शकील अकबर शेख याबरोबर अपहरण होण्यापूर्वी विकासनगर येथून कपडे आणण्यासाठी रणवरे वस्ती जिंती येथे गेला होता. ते कपडे घेऊन परत घरी येत असताना अज्ञात तीन व्यक्तींनी त्यांच्या मोटारसायकलला गाडी आडवी मारून त्यांची मोटारसायकल अडवून शकील यास त्यांचे मोटारसायकलचे मधल्या सीटवर बसवून त्याची मोटारसायकल घेऊन अज्ञातांनी अपहरण केले होते. याप्रकरणी संशयावरून पोलिसांनी संशयित विकास रघुनाथ आवटे यांस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांनी दिली. या गुन्ह्याच्या अनुशंगाने तीन फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या तीन फरारी आरोपींना अटक केल्यानंतर नक्की हत्या कोणत्या कारणासाठी झाली व यात कोणाकोणाचा सहभाग होता हे स्पष्ट होणार आहे.