वाघनख्यांच्या तस्करीप्रकरणी एकास अटक- पाच लाखांच्या दोन नख्या जप्त, वडगाव हवेलीत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 11:02 PM2018-09-08T23:02:40+5:302018-09-08T23:06:31+5:30
वाघनख्यांची तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली, तर अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्या नख्यांसह इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कऱ्हाड : वाघनख्यांची तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली, तर अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्या नख्यांसह इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई कऱ्हाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने केली.
अवधूत जगदीश जगताप (वय १८, रा. खुबी, ता. कºहाड) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे, तर त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, वाघनख्यांच्या तस्करीत आणखी काहीजणांचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव हवेली हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ दोघेजण वाघनख्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना मिळाली. त्यानुसार उपअधीक्षक ढवळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर यांच्यासह कॉन्स्टेबल सागर बर्गे, हवालदार बी. आर. जगदाळे, ए. आर. जमादार, पी. पी. पवार, सौरभ कांबळे, कॉन्स्टेबल रमेश बरकडे या कर्मचाºयांचे पथक तयार करून संबंधित ठिकाणी सापळा रचला.
पोलीस पथक सायंकाळी पेट्रोल पंप परिसरात साध्या वेशामध्ये पोहोचले. रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून दोघेजण त्याठिकाणी आले. पंपापासून काही अंतरावर दुचाकी थांबवून ते दोघे मोबाईलवर बोलत होते. पोलिसांना संशय आल्यामुळे साध्या वेशातील दोन कर्मचारी त्याठिकाणी गेले. त्यांनी संबंधित दोघांशी वाघनख्यांच्या विक्रीबाबत चौकशी सुरू केली. त्यावेळी संशयितांनीही नख्यांची किंमत सांगत सतरा हजार रुपयांत नख्या विकण्याचे कबूल केले. त्यांनी नख्या काढून दाखविल्यानंतर सापळा रचून आसपास थांबलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोन धारदार चाकूही त्यांच्याकडे आढळून आले. पोलिसांनी वाघनख्या, चाकू तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.
या गुन्ह्यात अवधूत जगताप याला पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. त्यावेळी वनाधिकाºयांनीही भेट देऊन वाघनख्यांची पाहणी केली. या नख्यांची किंमत पाच लाखांपर्यंत असावी, असे वनाधिकाºयांनी स्पष्ट केले.
संपर्क कुणाशी केला?
पेट्रोल पंपाजवळ पोहोचल्यानंतर दोन्ही संशयित वारंवार मोबाईलवरून कोणाशी तरी संपर्क साधत होते. त्या मोबाईलवर बोलणाऱ्यांपर्यंत पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत. ज्यांच्याशी संशयित संपर्क साधत होते ती व्यक्ती कदाचित नख्यांची खरेदी करण्यासाठी येणार असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.
मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता
वाघनख्यांची तस्करी एक-दोन मुले करू शकत नाहीत. यामागे मोठी टोळी कार्यरत असावी, असा पोलिसांना संशय आहे. या वाघनख्या कोठून आणल्या? वाघाची शिकार नेमकी कुठे आणि कुणी केली? याचा सध्या पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे.