पालिकेच्या बांधकाम विभागात खुर्ची एक अन् अधिकारी दोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:03 AM2021-01-08T06:03:27+5:302021-01-08T06:03:27+5:30
सातारा : सातारा नगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता म्हणून दिलीप चिद्रे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. अभियंता भाऊसाहेब पाटील ...
सातारा : सातारा नगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता म्हणून दिलीप चिद्रे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. अभियंता भाऊसाहेब पाटील यांची बदली न झाल्याने या विभागात आता ‘खुर्ची एक आणि अधिकारी दोन’ असा पेच निर्माण झाला आहे.
दिलीप चिद्रे यांनी सातारा पालिकेत जून २०१३ ते जून २०१६ या कालावधीत मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासमवेत काम केले आहे. चार वर्षांनंतर पुन्हा एकदा चिद्रे व बापट यांना पालिकेत एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. वास्तविक दिलीप चिद्रे जुलैमध्ये सातारा पालिकेत रिपोर्ट करून पुन्हा बदलीच्या प्रयत्नांत राहिले. त्यांना लातूरसाठी बदली हवी होती. मात्र, प्रशासकीय कारणांमुळे चिद्रे तातडीने सातारा पालिकेत हजर झाले.
भाऊसाहेब पाटील यांची बदली मंत्रालय पातळीवरून लटकल्याने ते अजूनही साताऱ्यातच आहेत. त्यामुळे सध्या ‘खुर्ची एक व अधिकारी दोन’ असा पेच बांधकाम विभागात निर्माण झाला आहे. या पेचावर मुख्याधिकारी अभिजीत बापट कसा मार्ग काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चिद्रे यांनी पदभार स्वीकारताच नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेतली.