गुरुजींची माहिती एका क्लिकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:46 AM2019-05-29T00:46:03+5:302019-05-29T00:47:31+5:30
आॅनलाईन बदली प्रक्रियेबरोबरच अन्य बाबींमध्ये शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेकडे संग्रहित असावी म्हणून शिक्षकांच्या माहितीचे मॅपिंग करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते.
सातारा : आॅनलाईन बदली प्रक्रियेबरोबरच अन्य बाबींमध्ये शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेकडे संग्रहित असावी म्हणून शिक्षकांच्या माहितीचे मॅपिंग करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, यामुळे गुरुजींची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दरवर्षी संगणक प्रणालीवर मॅपिंग करावे लागू नये म्हणून यावर्षी सर्व शिक्षकांचे मॅपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेंतर्गत शिक्षकांच्या माहितीचे संकलन करताना फक्त बदलीपात्र शिक्षकांचे नव्हे तर सर्व शिक्षकांच्या माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. यामुळे संगणक प्रणालीत सर्व शिक्षकांची माहिती भरण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, शिक्षकांची बदली प्रक्रिया व सेवानिवृत्ती ३१ मे पूर्वी होते. अशा शिक्षकांना संगणक प्रणालीत मॅप न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे शिक्षक संगणक प्रणालीत मॅप करण्यासाठी सिस्टीमद्वारे दाखवले जाणार नाहीत. तसेच अशा शिक्षकांचे पद संगणक प्रणालीत रिक्त म्हणून नमूद करण्याचे सूचित केले आहे. ज्या शाळांमध्ये एकही शिक्षक कार्यरत नाही, अशा शून्य शिक्षक असलेल्या शाळांना मॅप करण्याची सुविधा संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चुकीची माहिती देणारे रडारवर
चुकीची माहिती भरून मागील वर्षी बदली करून घेतलेल्या दोषी शिक्षकांना संगणक प्रणालीमध्ये मॅप करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशा शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून यापूर्वीच कारवाई झाली आहे, त्या शिक्षकांना या सुविधेमध्ये मॅप करता येणार नाही. दोषी असलेल्या ज्या श्क्षिकांवर उद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, फक्त अशाच शिक्षकांना या सुविधेंतर्गत मॅप करण्याचे सुचित करण्यात आले आहे. दोषी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत संबंधित शाळेत एक जागा रिक्त दाखवणे आवश्यक करण्यात आले आहे.
मॅपिंग प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शिक्षकांची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे शासनाकडून कोणतीही माहिती लपून राहणार नाही. याचा फायदा आॅनलाईन बदली प्रक्रियेसाठीही होणार आहे.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक