विडणीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:37+5:302021-06-09T04:48:37+5:30
कोळकी : विडणी, ता. फलटण येथे शेतातील गवत काढून बाहेर बांधावर टाकत असताना युवकाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू ...
कोळकी : विडणी, ता. फलटण येथे शेतातील गवत काढून बाहेर बांधावर टाकत असताना युवकाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. सुनील ज्ञानदेव जाधव (वय ४०) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विडणी येथील सुनील जाधव हे शनिवार, दि. ५ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घराशेजारील शेतातील गवत काढून बाहेर बांधावर टाकत असताना बांधाजवळ असणाऱ्या महावितरणच्या विद्युतखांबास ओढून बांधलेल्या तारेला (ताण) करंट आल्याने त्याचा धक्का सुनील यांना बसला. त्यामुळे ते जागीच बेशुद्ध पडले. शेतात असणाऱ्या लोकांनी आरडाओरडा केल्याचे पाहून घरातून त्यांचा चुलत भाऊ जोतिबा जाधव यांनी पळत जाऊन पाहिले असता लाकडाच्या साह्याने चिकटलेल्या तारेपासून सोडवून त्यास फलटण येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भरत खिलारे, विडणीचे अतिरिक्त सहायक अभियंता भरत भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय गणपत जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. सुनील जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ भावजय असा परिवार आहे.
०७सुनील जाधव
मयत सुनील जाधव