नदीपात्रात पडलेल्या चिमुरडीला वाचविताना एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:04+5:302021-06-09T04:49:04+5:30
फलटण : बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथून येत असलेली दुचाकी कांबळेश्वर हद्दीत आली असता बंधाऱ्याच्या संरक्षक कठड्याला धडकली. त्यामुळे झालेल्या ...
फलटण : बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथून येत असलेली दुचाकी कांबळेश्वर हद्दीत आली असता बंधाऱ्याच्या संरक्षक कठड्याला धडकली. त्यामुळे झालेल्या अपघातानंतर मोटारसायकलच्या टाकीवर बसलेली पाच वर्षांची मुलगी निरा नदीपात्रात पडली. तिला वाचविण्यासाठी तेथे मासे पकडत असलेल्या मुलांनी नदीपात्रात उड्या मारल्या. मात्र त्यातील एकाला पोहायला येत नसल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. यातच त्याचा मृत्यू झाला. शुभम संतोष भिसे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सचिन वसंत शिंदे (रा. आदर्की, ता. फलटण) हे रविवारी सायंकाळी पाच वाजता पाच वर्षे वयाच्या मुलीला मोटारसायकलवरून घेऊन कांबळेश्वर ता. बारामतीहून कांबळेश्वर (ता. फलटण) कडे येत होते. त्यांच्या दुचाकीची धडक संरक्षक कठड्याला झाली. यामध्ये अल्पवयीन मुलगी नदीपात्रात पडली. पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणार तेवढ्यात तिथे मासे पकडण्यासाठी थांबलेल्या मुलांनी नदीत उड्या मारल्या. त्या मुलीला वाचविले मात्र या मुलांमध्ये शुभम संतोष भिसे (वय १७) यानेही उडी मारली. मात्र त्याला पोहायला येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह सोमवारी महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या मदतीने बाहेर काढला. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार विलास यादव तपास करीत आहेत.
चौकट
पोहता येत नसतानाही वाचविण्यासाठी उडी
शुभम भिसे हा पुणे येथे राहत होता. तो कांबळेश्वर (ता. बारामती) येथे आपल्या मामाकडे आला होता. पोहायला शिकण्यासाठी तो नदीवर आला होता मात्र लहान मुलगी पडल्याने त्याने धाडसाने नदीत उडी मारली. त्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.