सातारा: बुडणाऱ्याचा शोध घेताना पट्टीचा पोहणाराच बुडाला, कोरेगावात पसरली शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 02:44 PM2022-10-29T14:44:52+5:302022-10-29T14:48:25+5:30
मृतदेहाचा शोध घेण्यास सुरूवात केल्यानंतर काही वेळातच तेही त्याच ठिकाणी बुडाले
कोरेगाव : भक्तवडी, ता. कोरेगाव येथील वसना नदीवर असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यास गेलेल्या सुरेश बंडू उगले (वय २२) या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या कोरेगाव येथील दत्तात्रय बाळासाहेब बर्गे उर्फ रवीअप्पा (वय ५३) यांचाही बुडून दुर्देवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे रवीआप्पा हे पट्टीचे पोहणारे होते. त्यांनी यापूर्वी अनेकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले होते. त्यांच्या निधनाने कोरेगावात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भक्तवडी येथे वसना नदी पात्रात बंधारा असून, तेथे मोठ्याप्रमाणावर पाणीसाठा झालेला आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ऊस तोडणी कामगारांच्या टोळीतील सुरेश उगले हा तरूण मित्रांसमवेत बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. तेथे पाण्याच्या प्रवाहात तो बुडाला. ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला. मात्र मृतदेह हाती लागला नाही.
त्याचवेळी कोरेगाव पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी कोरेगाव येथील पट्टीचे पोहणारे दत्तात्रय बर्गे उर्फ रवीअप्पा यांना मोबाईलवरुन संपर्क साधला आणि मृतदेह शोधण्यासाठी बोलावून घेतले. बर्गे यांनी मृतदेहाचा शोध घेण्यास सुरूवात केल्यानंतर काही वेळातच तेही त्याच ठिकाणी बुडाले. बऱ्याच वेळानंतर त्यांचा मृतदेहच बाहेर आला. त्यानंतर तरूणाचाही मृतदेह सापडला. एकाच ठिकाणी दोघांचाही मृत्यू झाल्याने कोरेगावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी बर्गे यांचा मृतदेह एका खासगी गाडीतून उपजिल्हा रुग्णालयात आणून ठेवला आणि बर्गे कुटुंबियांना अथवा नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता निघून गेले. रुग्णालयातील महिला परिचारिकेमुळे बर्गे कुटुंबियांना घटनेची माहिती समजली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात कुटुंबियांसह नागरिकांनी गर्दी केली.
मृत्यूच्या चौकशीची मागणी
याप्रकरणी राहूल पुरुषोत्तम बर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हा प्रकार गंभीर असून, संशयास्पद आहे. दत्तात्रय बर्गे यांच्या मृत्यूची व संशयित प्रकाराची चौकशी करण्यात यावी. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.