पॉलिशचा एक बहाणा पचला.. दुसरा पोलिसांपर्यंत पोहोचला; बिहारचा तरुण साताऱ्यात अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 05:04 PM2022-03-12T17:04:07+5:302022-03-12T17:18:05+5:30
पॉलिश करत असताना या दोघांनी हातचलाखी करून काही सोने काढून घेतले. त्यानंतर दोघे तेथून निघून गेले.
सातारा : सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून दोघांनी महिलेला गंडवलं. एवढेच नव्हे तर दागिने घेऊन त्यांनी पलायन केलं खरं पण एक बहाणा पचण्यापूर्वीच त्यांचा दुसरा साथीदार पोलिसांच्या हाती लागला. यामुळे यापूर्वी या दोघांनी केलेले अनेक बहाणे आता उघडकीस येणार आहेत. पोलिसांनी अटक केलेला तरूण बिहारचा असल्याचे समोर आले आहे.
सोन्याचे दागिने, भांडी, चांदी अशा प्रकारच्या वस्तू पॉलिश करून देतो, असे सांगत अनेकजण फिरत असतात. विश्वास संपादन केल्यानंतर हातचलाखी करून दागिने घेऊन संबंधित टोळकं पसार होत होतं. दागिन्यांना पाॅलिश करून देतो, असे बहाणे सांगून यापूर्वी बऱ्याच महिलांना लुटण्यात आलंय. अशा प्रकारच्या बहाण्याचा गुन्हा आत्तापर्यंत उघडकीस आला नव्हता. मात्र, सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला हा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले.
गोडोलीतील लता पाटील यांच्या घराजवळ काही दिवसांपूर्वी दोन युवक आले. त्या युवकांनी पितळ, चांदी पॉलिश करून देतो, असे सांगितले. पाटील यांनी त्यांना चांदीचे ताट व तांब्याचा कलश दिला. ही दोन्ही भांडी त्या दोघांनी पॉलिश करून अगदी चकाचक केली. त्यामुळे पाटील यांचा विश्वास बसला. त्यांनी सोन्याच्या ४० ग्रॅमच्या चार बांगड्या त्या दाेघांजवळ पॉलिश करण्यासाठी दिल्या. या बांगड्यांना पॉलिश करत असताना या दोघांनी हातचलाखी करून काही सोने काढून घेतले. त्यानंतर दोघे तेथून निघून गेले.
परंतू काही वेळानंतर हे दागिने वजनाला हलके वाटत असल्याचे पाटील यांना शंका आली. त्यांनी तातडीने सराफाच्या दुकानात जाऊन खातरजमा केली असता सोने १२ ग्रॅमने कमी झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दोघा आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांना कऱ्हाडमध्ये एकजण असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जाऊन राहुल अजयकुमार साह (वय २०, रा. बिहार) याला ताब्यात घेतले. त्याला साताऱ्यात आणल्यानंतर त्याने आपला आणखी एक साथीदार असून, तो सध्या पसार झाला आहे. आम्ही दोघांनी मिळून हा गुन्हा केलाच शिवाय सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातही अनेक गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पोलीस नाइक सुजीत भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे आदींनी केली.
एका जिल्ह्यात एकच गुन्हा..
दागिन्यांना पाॅलिश करून देतो, असे सांगून महिलांना लुटणारे हे दोघे एका जिल्ह्यात एकच गुन्हा करत होते. त्यानंतर ते दुसऱ्या जिल्ह्यात जात होते. त्यामुळे ते पोलिसांना सापडत नव्हते. राहण्याचा पत्ताही सातत्याने बदलत होते.