इकडं दोस्ती तर तिकडं दुश्मनी !

By admin | Published: February 17, 2017 10:47 PM2017-02-17T22:47:09+5:302017-02-17T22:47:09+5:30

सोंगट्यांचा खेळ : जिल्ह्यात निवडणुकीतील शत्रुत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या

One friendship, while the enemy is the enemy! | इकडं दोस्ती तर तिकडं दुश्मनी !

इकडं दोस्ती तर तिकडं दुश्मनी !

Next

सातारा : ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!’, ही काव्यपंक्ती सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या सध्याच्या राजकीय वातावरणाबाबत तंतोतंत जुळत आहे. राजकारणाचे संदर्भ बदलणारी ‘न भूतो...’ अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. पक्षीय राजकारणाला तिलांजली दिली गेली आहे. निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात विरोधी पक्षाचा दबाव संपुष्टात येईल, असे स्पष्ट चित्र आत्तापासूनच दिसायला लागले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाने सोयीच्या आघाड्या आणि युती केल्या आहेत. स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन नेतेमंडळींनी ही गणिते जुळवली आहेत. नेत्यांनी ठरविल्याप्रमाणे सोंगट्या निवडून आल्या तर जिल्हा परिषदेत भलतेच रंगीबेरंगी चित्र दिसू शकते. या चित्रामुळे राजकारणाचा बेरंगही होऊ शकतो, असा अनेकांचा अंदाज आहे.
सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राजकारणात काँगे्रसचा कायमच प्रभाव राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आल्यापासून सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेवर काँगे्रसचा पगडा कायम राहिला. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँगे्रसपासून विभक्त झाल्यानंतर हीच सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.
काँगे्रस आणि राष्ट्रवादी हे पक्ष विभक्त झाले असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्येच स्पर्धा होत राहिली. जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर काँगे्रसने प्रबळ विरोधकाची भूमिका कायम ताकदीने बजावली. काँगे्रसचे संख्याबळही उल्लेखनीय असेच राहिले. या संख्याबळामुळेच काँगे्रसने कायमच राष्ट्रवादीला लगाम लावण्याचे काम केले. काँगे्रसने वेळोवेळी आपली ताकद दाखवून दिली. सध्याच्या निवडणुकीत काँगे्रसने नीती बदलल्याचे चित्र स्पष्ट झाले.आताची परिस्थिती राजकारणाचा बेरंग करणारी अशीच झाली आहे. सातारा तालुक्यात एकाही गटात व गणात काँगे्रसच्या चिन्हावर उमेदवार लढणार नाही. काँगे्रसने सातारा विकास आघाडीलाच ‘एनओसी’ देऊन टाकली. खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यापुढे जाऊन सातारा तालुक्यातील नागठाणे व वनवासवाडी या दोन गटांत भारतीय जनता पार्टीला सोबत घेतले. वाई तालुक्यात भाजप व रिपाइं एकत्र आली. काँगे्रसचे प्रमुख मोहरे भाजपने आपल्याकडे ओढले.
कऱ्हाड दक्षिणमध्ये काँगे्रसने राष्ट्रवादीचा हात धरला आहे. वारुंजी, येळगाव, काले, रेठरे व कार्वे गोळेश्वर या गटांत काँगे्रस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. फलटण, माण, खटाव या तालुक्यांत काँगे्रस व स्वाभिमानी पक्ष एकत्र आलेत. शिवसेना व भाजपने काही ठिकाणी एकमेकांना पूरक भूमिका घेतली आहे. खंडाळा तालुक्यात राष्ट्रवादीला खरा धोका अपक्षांचाच आहे.
जिल्हा परिषदेच्या राजकारणात सत्ताधारी पक्षाइतकेच विरोधी पक्षांचेही महत्त्व असते. मात्र, विरोधक विभागून जाण्याची शक्यता असल्याने संघ शक्तीची कमतरता जिल्हा परिषदेत पाहायला मिळेल, असे अनेकांचे अंदाज आहेत. (प्रतिनिधी)


बहुमताची सत्ता ? आता म्हणे विसरा !
राष्ट्रवादी, काँगे्रस, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांसोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप बहुजन महासंघ, रासप या पक्षांच्या सोयीस्कर आघाड्या व युत्यांमुळे जिल्हा परिषदेचे चित्र कसे असेल? याचीच चिंता कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला आता बहुमताची सत्ता विसरावी लागेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
एका तालुक्यात विरोधक दुसऱ्या तालुक्यात मित्र
थेट लढण्याचे आणि एकमेकांविरोधात भिडण्याचे दिवस इतिहासजमा झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. काँगे्रसची मंडळी राष्ट्रवादी आपला सर्वात मोठा शत्रू आहे, असे काही काळापूर्वी सांगत होती. आता तिच मंडळी राष्ट्रवादीच्या कऱ्हाडात हातात हात घालून चालत आहे. कऱ्हाड वगळता इतर ठिकाणी मात्र काँगे्रस व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये इर्ष्येचे राजकारण पाहायला मिळत आहे. सातारा तालुक्यात काँगे्रस व भाजप या दोन मतप्रवाह असणाऱ्या पक्षांची अदृश्य युती उदयनराजेंमुळे साकारली आहे.

Web Title: One friendship, while the enemy is the enemy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.