महाबळेश्वरात उभारणार शंभर बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:50+5:302021-04-24T04:40:50+5:30
महाबळेश्वर : ‘येथील कोरोनाबाधितांना तातडीने उपचार मिळावेत, म्हणून पालिकेने शंभर बेडचे कोरोना केअर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ...
महाबळेश्वर : ‘येथील कोरोनाबाधितांना तातडीने उपचार मिळावेत, म्हणून पालिकेने शंभर बेडचे कोरोना केअर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तीस ऑक्सिजन व पाच व्हेंटिलेटरची सोय असणार आहे,’ अशी माहिती नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी दिली.
यावेळी नगरसेवक कुमार शिंदे उपस्थित होते.
स्वप्नाली शिंदे म्हणाल्या, ‘महाबळेश्वर शहरातील नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहता, शहरातील नागरिकांची जबाबदारी पालिकेने घेण्याचे ठरविले आहे. म्हणून महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या माध्यमातून शंभर बेडची व्यवस्था असणारे कोरोना केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन दिवसांत परिपूर्ण प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेण्याच्या सूचनाही मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या मालकीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये किंवा भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या हॉटेल मिळकतीमध्ये हे कोरोना सेंटर उभारण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे बांधकाम अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्यासाठी येणारा खर्च व कोरोना केअर सेंटर उभारण्यासाठी येणारा अपेक्षित खर्च व भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या हॉटेलमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी येणारा खर्च या दोघांमधील कमी खर्च जेथे येईल, तेथेच हे सेंटर उभारण्यात येईल. या ठिकाणी डॉक्टर, परिचारिका व इतर आवश्यक तंत्रज्ञ व नॉन टेक्निकल स्टाफ भरतीसाठी लवकरच नगरपालिकेतर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्ये कोरोना केअर सेंटर उभारण्याचा मानस आहे.