साताऱ्यात शंभर खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय- महाराष्टत दोनच ठिकाणी मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:53 PM2019-09-25T23:53:22+5:302019-09-25T23:53:51+5:30

खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे महिलांसाठी हे नवे रुग्णालय वरदान ठरणार आहे. महिलांच्या आरोग्य सेवेसाठी रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचा मनोदय सिव्हिलच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

One hundred beds independent women's hospital in Satara | साताऱ्यात शंभर खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय- महाराष्टत दोनच ठिकाणी मंजुरी

साताऱ्यात शंभर खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय- महाराष्टत दोनच ठिकाणी मंजुरी

Next
ठळक मुद्दे उभारणीस सुरुवात : १० नवे डॉक्टर अन् ४० कर्मचाऱ्यांचा स्टाफ

दत्ता यादव ।
सातारा : अनेक दिवसांपासून मंजुरी मिळूनही प्रतीक्षेत असलेल्या शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाच्या बांधकामास अखेर मंगळवारी प्रारंभ झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य महिलांना आता लवकरच चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून, जिल्हा रुग्णालयावरील आरोग्य सेवेचा ताणही आता कमी होणार आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सध्या रुग्णांसाठी २४१ खाटांची परवानगी आहे. मात्र, रोज पाचशेहून अधिक रुग्ण सिव्हिलमध्ये दाखल होत असतात. परिणामी रुग्णांची गैरसोय होत होती. विशेषत: सिव्हिलमध्ये दाखल होणाºया रुग्णांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असल्यामुळे या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. अखेर इमारतीच्या बांधकामास बुधवारी प्रारंभ झाला. सध्या असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीच्या डाव्या बाजूला मोकळी जागा आहे. या जागेमध्ये तीन मजली इमारत उभारण्यात येत आहे. जवळपास आठ हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम करण्यात येत आहे. शंभर खाटांच्या या रुग्णालयामध्ये १० डॉक्टर आणि ४० कर्मचाºयांचा ताफा असणार आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी क्ष-किरण शास्त्रज्ज्ञ, आहार तज्ज्ञ आदी रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार आहे.

याशिवाय नव्या रुग्णालयामध्ये ११ स्वतंत्र विभागही तयार करण्यात आले आहेत. व्रणोपचारक, शस्त्रक्रियागृह, रक्तपेढी, अपघात विभाग, प्रयोगशाळा, बाह्यरुग्ण सेवक, शिपाई, सफाईगार, स्वयंपाकी, पहारेकरी, कक्षसेवक या विभागांचा त्यामध्ये समावेश आहे.

जिल्ह्यात प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय होत असल्याने सर्वसामान्य महिलांना या नव्या रुग्णालयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे महिलांसाठी हे नवे रुग्णालय वरदान ठरणार आहे. महिलांच्या आरोग्य सेवेसाठी रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचा मनोदय सिव्हिलच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.


संपूर्ण महाराष्टत दोनच ठिकाणी मंजुरी
महाराष्ट्रामध्ये बारामती, सातारा जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी शंभर खाटांचे स्वतंत्र रुग्णालय मंजूर करण्यात आले होते. बारामतीचे रुग्णालयाचे बांधकाम यापूर्वी पूर्ण झाले आहे. आता साताऱ्यातील रुग्णालय सुरू होणार असल्याने सिव्हिलमधील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.


सध्या जमीन सपाटीकरण आणि बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे. दीड ते दोन वर्षांत हे नवे रुग्णालय महिलांच्या आरोग्यसेवेसाठी सज्ज होणार आहे. या रुग्णालयामुळे केवळ आरोग्याची सुविधाच नव्हे तर सर्वसामान्यांना रोजगाराची संधीही उपलब्ध झाली आहे.
 

काही दिवसांपूर्वीच मी पद्भार स्वीकारला असून, पेंडिंग कामावर तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिलांसाठी शंभर खाटांच्या रुग्णालयाला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. परंतु त्याचे काम आम्ही आता तातडीने हाती घेतले आहे.
- डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

Web Title: One hundred beds independent women's hospital in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.