यंदा सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:29 AM2021-06-01T04:29:27+5:302021-06-01T04:29:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दहावीच्या मूल्यांकनासाठी नववीच्या गुणांचा आधार घेण्याच्या निर्णयासह शिक्षण विभागाच्या निर्णयाने शाळा प्रशासन, मुख्याध्यापक आणि ...

One hundred percent result of all schools this year! | यंदा सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के!

यंदा सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दहावीच्या मूल्यांकनासाठी नववीच्या गुणांचा आधार घेण्याच्या निर्णयासह शिक्षण विभागाच्या निर्णयाने शाळा प्रशासन, मुख्याध्यापक आणि शिक्षक गोंधळले आहेत. शाळा व्यवस्थापनावर निकाल लावण्याचा ताण येणार असला तरीही जिल्ह्यात पहिल्यादांच सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागणार आहे.

शासनाच्या या निकालाबाबत विविध स्तरांवर मतमतांतरे आहेत. सुमोर ४० टक्के शाळांची लेखी परीक्षा झालेली नाही. मग या गुणांचे समानीकरण कसे होणार हा प्रश्न आहे. तोंडी परीक्षा झाली नाही, गुण देण्यासाठी आता या परीक्षा कशा घ्यायच्या हेही शाळांना समेजना. अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ‘सीईटी’ परीक्षा होणार आहे. त्याशिवाय दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनातून जाहीर झालेल्या निकालाबाबत विद्यार्थी समाधानी नसतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र परीक्षा होणार आहे. मग सर्वच विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा घेण्याला काय हरकत आहे? असा सूर काही पालक आणि तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

एकूणच शिक्षण विभागाच्या नवीन मूल्यमापन धोरणामुळे दहावीच्या निकालाची सर्वच्या सर्व जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनावर येऊन पडल्याने आता तेही गोंधळले आहेत. त्यात न्यायालयीन प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर जूनअखेरपर्यंत निकाल लावणेही अवघड होईल, असं शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने हा गोंधळ मार्गी लावून तातडीने अंतिम निर्णय जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

चौकट

असे असेल नवे सूत्र

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ५०-३०-२० असा दहावी निकालाचा नवा फॉर्म्युला असणार आहे. याअंतर्गत नववीत मिळालेल्या गुणांचे ५० टक्के गुण, वर्षभरात दहावीच्या विविध लेखी परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांचे ३० गुणांकनाने लेखी अन् २० गुणांकनाने तोंडी परीक्षेच्या गुणांची बेरीज करण्यात येणार आहे. या सर्वांची गोळाबेरीज करून विद्यार्थ्यांना दहावीचे गुण देण्यात येतील, असे शासनाने न्यायालयात म्हणणे सादर केले आहे. यावर न्यायालयाचा निकाल मंगळवार दि. १ जून रोजी येणार आहे.

पुढील प्रवेशाचे काय होणार?

दहावी निकालाचा गोंधळ सुरू असतानाच सीईटी ऐच्छिक करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे आपल्या आवडीच्या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारावर जाण्यासाठी विद्यार्थी करत असलेल्या प्रयत्नांवरही पाणी फिरणार आहे. सीईटी न देता विद्यार्थ्यांना कोणत्या आधारे प्रवेश दिला जाईल याची कुठेच स्पष्टता नसल्याने पुढील प्रवेशाचेही गोंधळ सुरू राहणार आहेत.

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात

१. नववीच्या गुणांवर दहावीचे मूल्यमापन करणं काही विद्यार्थ्यांवर अन्यायकारक होऊ शकते. दुसरं म्हणजे दहावीत विद्यार्थी शाळेतच आले नाहीत तर त्यांच्या लेखी परीक्षा झाल्या केव्हा? हा सगळाच गोंधळ आहे. यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शैक्षणिक विश्वाचे नुकसान होणार आहे.

- डॉ. चंद्रकांत माने, पाटण

२. दहावीसाठी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली होती. तो अभ्यासक्रम सीईटीसाठी असणार आहे का? शिवाय सीबीएसई, आयसीएसईच्या मुलांसोबत सीईटी देताना त्यांचा अभ्यासक्रम, आमचा अभ्यासक्रम वेगळा असताना गुणांची समानता कशी राखणार हा प्रश्न आहेच. याबाबत खुलासा होणं अपेक्षित आहे.

- डॉ. सुधीर इंगळे, फलटण

३. शिक्षण विभागाने जो निर्णय दहावी मूल्यांकनाबाबत घेतला आहे, तो नक्कीच चांगला आहे. मात्र, अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी सदंर्भातील निर्णय बंधनकारक ठेवावा असे वाटते. समान गुणवत्तेवरील प्रवेशासाठी ते आवश्यक आहे.

- प्रा. माधवी बर्गे, सातारा

विद्यार्थी गोंधळलेलेच

१. नववीच्या गुणांचे पन्नास टक्के घेणार म्हटल्यावर आमचं उत्तीर्ण होणं निश्चित आहे. पण अद्यापही सीईटीचा प्रारूप आराखडा, अभ्यासक्रम काहीच उपलब्ध नसताना आम्ही पुढच्या वर्गात जायची तयारी कशी करावी हेच समजत नाही.

- नम्रता जाधव, विद्यार्थिनी

२. आमच्या परीक्षांवर सुरू असलेल्या चर्चेने आता भीतीच वाटू लागली आहे. कधी परीक्षा द्या कधी रद्द असं अनिश्चिततेचे वातावरण त्रासदायक आहे. एकच काय ते ठरवा आणि आम्हाला कळवा, पण सकाळ-संध्याकाळ या चर्चांनी खच्चीकरण होतंय.

- वरुण पवार, विद्यार्थी

पालक काय म्हणतात?

१. कोविडमुळे सर्वत्रच गोंधळाची परिस्थिती मान्य आहे. शासनाने घेतलेला कोणताही निर्णय एकाच वेळी सगळ्यांना मान्य होईल असे अजिबात नाही. पण सामूहिक हिताचा निर्णय आणि तोही लवकर घेऊन मुलांच्या मनातील गोंधळ संपवावा. म्हणजे त्यांना पुढच्या तयारीसाठी वेळ देता येईल.

- अश्विनी जंगम, पालक

२. अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण मिळालेल्यांच्या गुणांचा अकरावीसाठी उपयोग होणार नाही का? सीईटी महत्त्वाची असेल तर ती ऐच्छिक का? ठेवली? ती सक्तीची किंवा मग रद्दच करणं योग्य होते. यातून फक्त संभ्रम वाढला आहे.

- असिफ खान, पालक

Web Title: One hundred percent result of all schools this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.