म्हसवड नजीक कार-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीवरील एक ठार, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 03:00 PM2022-04-25T15:00:42+5:302022-04-25T15:01:29+5:30
म्हसवड : म्हसवड-मायणी रस्त्यावर दिडवाघवाडी ता. माण येथे कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. ...
म्हसवड : म्हसवड-मायणी रस्त्यावर दिडवाघवाडी ता. माण येथे कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. तर एकजण जखमी झाला. हा अपघात आज, सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झाला. बापू बाबा पुकळे असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, आज, सकाळच्या सुमारास बापू बाबा पुकळे हे दुचाकीने विरकरवाडीवरुन पुकळेवाडीकडे निघाले होते. दरम्यान, कार चालक सुमित बाळासाहेब पाटोळे (रा. भैरवनाथ पार्क कळंबा ता. करवीर जि. कोल्हापूर) (एमएच ०५ सीए १७१८) हे कारने मायणीवरुन म्हसवडच्या दिशेने येत होते. यावेळी दुचाकी व कारची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेमध्ये दुचाकी चालक बापू पुकळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रोशन उत्तम पुकळे (दोघे रा. पुकळेवाडी ता. माण) हे गंभीर जखमी झाले. या घटनेची फिर्याद म्हसवड पोलीस ठाण्यात प्रविण मच्छिंद्र हुबाले यांनी दिली. म्हसवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रस्ता सपाट करणे गरजेचे
म्हसवड-मायणी रस्त्यावर दिडवाघवाडी येथील रस्त्यावर म्हसवडकडून जाताना तीव्र चढ असून येथून जाणाऱ्या वाहनधारकांना समोरुन मायणीकडून येणारे वाहन दिसत नाही. या ठिकाणी असंख्य अपघात झाले आहेत. चार जणांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा चढ काढून हा रस्ता सपाट करावा अशी मागणी वाहनधारकातून होत आहे.