एक राजे सेनेसोबत, दुसरे भाजपसोबत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 11:22 PM2017-08-07T23:22:55+5:302017-08-07T23:23:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या मतदानावेळी अनेक छुप्या युत्या उघडकीस आल्या. जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी तासभर चर्चा केली तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार मकरंद पाटील यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप नेत्यांसोबत उघड चर्चेतून भाजपशी केलेल्या सलगीचे जाहीरपणे विवेचनच केले. त्यामुळे ‘एक राजे सेनेसोबत तर दुसरे भाजपसोबत,’ असे नवे चित्र साताºयाच्या राजकीय पटलावर तयार झाले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन केंद्रांवर मतदान झाले. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत ३९० मतदारांपैकी ३८७ मतदारांनी मतदान केले. नगरपालिकेच्या दोन तर नगरपंचायत विभागातील एका मतदाराचे मतदान झाले नाही. मतदान असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रवेशद्वारापासून ५० मीटर अंतरावर पोलिसांनी बॅरिगेटस लावले होते. मतदार वगळता इतर व्यक्तींना तिथून पुढे पोलिसांनी प्रवेश नाकारला. जिल्हा परिषद मतदारसंघातील ६४ पैकी ६४ मतदारांनी मतदान केले. नगरपंचायतीच्या १३६ मतदारांपैकी एक मतदान वगळता बाकीच्या १३५ मतदारांनी मतदान केले. तर नगरपालिकेच्या १९० मतदारांपैकी दोन मतदारांनी मतदान केले नाही. १८८ मतदारांनी मतदान केले. जिल्हा परिषदेसाठी शंभर टक्के मतदान झाले. नगरपंचायतीसाठी ९९.२६ टक्के व नगरपालिकेसाठी ९८.९५ टक्के मतदान झाले.
‘लोकमत’ने यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार काँगे्रस व शिवसेना हे दोन पक्ष खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत राहिले. खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी आमदार शंभूराज देसाई यांच्या साताºयातील ‘कोयना दौलत’वर जाऊन चर्चा केली होती. तर सोमवारी आमदार शंभूराज देसाई यांनी जलमंदिरवर जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा केली. शिवसेना, सातारा विकास आघाडी व काँगे्रसचे मतदार एकत्रितपणे मतदानासाठी आले. राष्ट्रवादी व भाजप नेत्यांची रविवारी व सोमवारीही खलबते झाली. जिल्हा शासकीय विश्रामगृहावर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ‘नियोजन’ केले. यानंतर भाजपचे मतदार मतदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. नगरपंचायतीचे मतदान दुपारी दोन वाजताच तब्बल ९७.७ टक्के झाले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या मतदानासाठी राष्ट्रवादीचे मतदारच न आल्याने भाजपने जिल्हा परिषदेचे मतदान थांबविले होते. राष्ट्रवादीचे मतदार आल्यानंतरच भाजप मतदारांनी मतदान केले.