वाईमध्ये दोन दिवसांत एक लाख रुपयांचा दंड, पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:59 AM2020-07-04T11:59:35+5:302020-07-04T12:01:12+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता नगरपरिषदेने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारपासून शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाईस करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन दिवसांमध्ये दोन लाखांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली.
वाई : कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता नगरपरिषदेने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारपासून शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाईस करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन दिवसांमध्ये दोन लाखांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली.
वाई नगरपरिषद हद्दीत सोनगीरवाडी, धर्मपुरी व ब्राह्मणशाही परिसरात दोनजण कोरोना आढळलेले आहेत. सोनगीरवाडी भागातील रुग्णाचा धर्मपुरीत व्यवसाय आहे. व्यवसाय करीत असताना संबंधित रुग्णाच्या दुकानामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांपैकी कोणाकडून तरी संसर्ग झाल्याची शक्यता आहे. अशा प्रकारे संसर्ग झाल्यास नागरिकांतून संसर्ग होण्याचा संभाव्य धोका निर्माण झाल्याने त्यावर नियंत्रण करणे आवश्यक आहे.
मुख्य बाजारपेठेतील दुकानांतील एकदम तेरा व्यक्ती बाधित आल्याने संपूर्ण बाजारपेठ हॉटस्पॉट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने ती बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आसपासच्या खेड्यातील ग्रामस्थांनी कोणत्याही कारणास्तव शहराच्या बाजारपेठेत येऊ नये, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
शहरातील सर्व व्यवसायधारकांची नगरपरिषदेने यादी तयार केलेली असून, त्याप्रमाणे संबंधित व्यवसायधारकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक केलेले आहे. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकात किमान तीन फुटांचे अंतर राहील याची खात्री करण्यात यावी.
दुकानामध्ये एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना मनाई करण्यात आलेली आहे. आपापले दुकानासमोर सुरक्षित अंतराबाबत नियम पाळण्यासाठी प्रत्येकाने चौकोन किंवा गोल आखण्यात यावेत. दुकानात वेळोवेळी जास्त वापरण्यात येणाऱ्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतराचे बंधन, मास्कचा वापर बंधनकारक केले आहे.
दुकानात येणाऱ्यांची होणार नोंद
प्रत्येक व्यावसायिकांनी दुकानामध्ये येणारे ग्राहकांची नोंद घेण्यासाठी एक स्वतंत्र रजिस्टर ठेवून त्याची तपशीलवार माहिती या रजिस्टरमध्ये ठेवण्यात यावी, असे नगरपरिषदेने सर्व दुकानदारांना बंधनकारक केलेले आहे. तशा लेखी नोटिसा सर्व दुकानदारांना केल्या असून, तत्काळ त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आलेली आहे.
तीन पथके तैनात
या रजिस्टरची तपासणी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी केव्हाही करतील. त्यासाठी कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, सभा अधीक्षक राजाराम जाधव आणि सहायक कर निरीक्षक अभिजित ढाणे यांच्या अधिपत्याखाली वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांची तीन स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत.