परवानगीने आले : महिन्यात एक लाखजणांची घरवापसी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:30 PM2020-05-26T22:30:16+5:302020-05-26T22:31:39+5:30
यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवपासी झालेली आहे.
सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात विविध ठिकाणी असलेले लोक आपापल्या गावी परतु लागले आहेत. गेल्या सव्वा महिन्याच्या काळात देशातून १ लाख ९ हजार जणांची सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी घरवापसी झाली आहे. हे सर्वजण परवाना व तपासणी नाक्यावरून आलेले आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून सर्वाधिक ६६ हजारजणांनी गाव जवळ केले आहे.
कोरोना विषाणूमुळे देशातच २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे नागरिकांवर बंधने आली. शासन नियम पाळावे लागेल. तर कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या, व्यवसायही थांबले. परिणामी लोकांना घरातच थांबून राहावे लागले. अशातच सातारा जिल्ह्यातून इतर राज्यात नोकरी, व्यवसायासाठी गेलेले. तसेच महाराष्ट्रातही नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या सातारा जिल्ह्यातील लोकांना गावी परतण्याचे वेध लागले होते. कारण कोरोनामुळे दूरगावी किती राहायचे, असा प्रश्न होता. यातून अनेकांनी घर जवळ केले; पण बहुतांशजणांना घरवापसी करता आली नाही. मात्र, शासनाने परवानगी दिल्याने अनेकजण आता जिल्ह्यात येऊ लागले आहेत.
१८ एप्रिलपासून २४ मेपर्यंत १ लाख ९ हजार ६०४ जणांनी सातारा जिल्ह्यात घरवापसी केली आहे. ई-पास आणि चेक पोस्टवरून हे सर्वजण आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवपासी झालेली आहे.
राज्याचा विचार करता मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून ६५ हजार ७९५ जण सातारा जिल्ह्यात आले आहेत. यामध्ये
मुंबईतून २८ हजार ९१३, ठाणे १९ हजार ७६ आणि रायगडमधील १७ हजार ८०६
जणांचा समावेश आहे. तसेच पुणे जिल्ह्यातून ११ हजार १३७, सांगलीतून ५ हजार ४१९, कोल्हापूरमधून ३ हजार ३५ जण आले आहेत. अशाप्रकारे राज्यातील विविध जिल्ह्यांत वास्तव्यास असलेल्या साताºयातील लोकांनी घरवापसी केली आहे. यापुढेही अनेकजण येणार आहेत. त्यामुळे हा आकडा वाढतच जाणार आहे.
सातारा तालुक्यात २० हजारजण आले
कोरोनामुळे बाहेरून सातारा जिल्ह्यात १ लाख ९ हजार जणांनी घरवापसी केली आहे. यामधील २० हजार ३१४ जण हे सातारा शहर व तालुक्यात आले आहेत. तर कºहाड तालुक्यात १२ हजार ६१७, पाटण १२ हजार ४६३, खटाव ११ हजार ६७६, माण तालुक्यात १० हजार ३४१ जण आले आहेत. तसेच वाई तालुक्यात ८ हजार ९८५, जावळी ८ हजार १९२, फलटण ७ हजार ४५७, महाबळेश्वर ६ हजार ५८८, कोरेगाव ६ हजार ११३ आणि खंडाळा तालुक्यात ४ हजार ८९४ जण आले आहेत.
प्रशासनाचे आवाहन
सातारा जिल्ह्यात अधिकृतरीत्या १ लाख ९ हजारजण आले आहेत. हे सर्वजण आपापल्या गावी आहेत; पण बाहेरून आलेल्यांनी स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. होम क्वॉरंटाईन व्हावे. आरोग्याबाबत काही तक्रार असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.