sangli: कासेगावात सावकाराचा डोक्यात गोळ्या झाडून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:10 PM2024-08-16T12:10:26+5:302024-08-16T12:10:42+5:30

कासेगाव : कासेगाव परिसरात सावकारी करणाऱ्या पांडुरंग भगवान शिद (वय ४३, रा. कासेगाव) याचा डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण खून ...

One shot dead by unknown persons in Kasegaon Satara | sangli: कासेगावात सावकाराचा डोक्यात गोळ्या झाडून खून

sangli: कासेगावात सावकाराचा डोक्यात गोळ्या झाडून खून

कासेगाव : कासेगाव परिसरात सावकारी करणाऱ्या पांडुरंग भगवान शिद (वय ४३, रा. कासेगाव) याचा डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना कासेगाव ते वाटेगाव शिवेनजीक एका विहिरीजवळ सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. हल्लेखाेरांनी पांडुरंग याच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर पैशांची देवघेव किंवा अन्य कारणातून खून झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत चुलतभाऊ शशिकांत महादेव शिद (रा. धनगर गल्ली, कासेगाव) यांनी कासेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पांडुरंग शिद हा परिसरात सावकारी करत होता. अनेकांना त्याने गरजेवेळी कर्ज दिले होते. सावकारीच्या कारणातून पांडुरंग याच्यावर सुमारे अकरा महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासेगाव परिसरातील शिद कुटुंबियांची कासेगाव-वाटेगाव शिवेला शेतजमीन आहे. त्यामध्ये प्रत्येकाने जनावरांच्या शेडची उभारणी केली आहे. पांडुरंग याचेही तेथे जनावरांचे शेड आहे.

पांडुरंग हा सकाळी शेतातील शेडकडे निघाला होता. त्याच्या पाळतीवर असलेल्या दोघांनी आबासाहेब शिद यांच्या विहिरीजवळ त्याला गाठले. गाडीवर असतानाच पांडुरंगच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. डोक्याच्या पाठीमागून आणि उजव्या कानाच्या पाठीमागून बंदुकीतून झाडलेल्या गोळ्या घुसल्यानंतर पांडुरंगला बचावाची संधी मिळालीच नाही. दुचाकीवरून तो खाली पडला. दुचाकी पायावरच पडल्यामुळे पाय अडकला. रक्तस्राव होऊन तो जागीच मृत झाला. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्यामुळे मारेकरी तेथून पसार झाले.

काही वेळांतच या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पांडुरंग शिद हा मृतावस्थेत पडल्याचे पाहिले. त्यांनी शिद कुटुंबियांना हा प्रकार कळवला. जवळच शेतात असलेल्या चुलतभाऊ शशिकांत शिद यांना हा प्रकार समजताच ते तत्काळ धावले. पाठोपाठ त्याचे भाऊ देखील आले. पांडुरंग याच्या डोक्यातून रक्त आले होते. उजव्या डोळ्याच्या भुवईजवळ लहान छिद्र दिसले. डोक्याच्या पाठीमागे जखम दिसली. तसेच उजव्या कानाच्या पाठीमागील बाजूसही छिद्र दिसले. बाजूलाच बंदुकीची गोळी पडलेली दिसली.

कासेगाव पोलिसांना प्रकार समजताच काही मिनिटांतच ते घटनास्थळी आले. श्वानपथकास पाचारण करून घटनास्थळाचा पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांना तातडीने हल्लेखोर कोण? याचा शोध घेण्यास सांगितले. मृत पांडुरंग याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

गोळ्या झाडून खुनाची पहिलीच घटना

बंदुकीने गोळीबार करून खून केल्याची ही कासेगाव परिसरातील पहिलीच घटना आहे. आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून किंवा अन्य कारणांतून ही घटना घडल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या तपासाकडे कुटुंबियांचे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मृत पांडुरंगवर सावकारी, तस्करीचे गुन्हे

मृत पांडुरंग शीद याच्या विरोधात बेकायदेशीर खासगी सावकारीप्रकरणी कासेगाव पोलिसात गुन्हा दाखल होता. तसेच कासव व मांडूळ तस्करी, बनावट सोने विक्रीप्रकरणी कऱ्हाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगानेही पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: One shot dead by unknown persons in Kasegaon Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.