क्रेन-दुचाकी अपघातात सख्या बहिणींपैकी एक ठार, एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 PM2021-04-14T16:14:18+5:302021-04-14T16:16:28+5:30
Accident Satara : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी, ता.सातारा येथे टोव्हिंग क्रेनने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघी सख्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाला तर दुसरी बहीण गंभीर जखमी झाली. तेजस्विनी काशिनाथ मसुगडे (वय २३) असे मृत बहिणीचे तर किरण काशीनाथ मसुगडे (वय २१, दोघी रा.अपशिंगे.(मि.) ता.सातारा) असे गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या बहिणीचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी झाला.
नागठाणे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी, ता.सातारा येथे टोव्हिंग क्रेनने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघी सख्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाला तर दुसरी बहीण गंभीर जखमी झाली. तेजस्विनी काशिनाथ मसुगडे (वय २३) असे मृत बहिणीचे तर किरण काशीनाथ मसुगडे (वय २१, दोघी रा.अपशिंगे.(मि.) ता.सातारा) असे गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या बहिणीचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातून मंगळवारी सायंकाळी टोव्हिंग क्रेन (नं. एम एच ०९ बी सी २९२८) चालक भरधाव वेगाने कोल्हापूरकडे निघाला होता. ही टोव्हिंग क्रेन भरतगाववाडी, ता.सातारा गावच्या हद्दीत आली असता तिने पुढे चाललेल्या मोटारसायकला (एम एच ११ सी वाय ३१२०) पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीवरील दोघी बहिणी अक्षरशः चेंडूसारख्या हवेत उडाल्या. तर त्यांची दुचाकीही अनेक पलट्या खाऊन महामार्गावरून खाली खड्ड्यात जाऊन पडली. तर टोव्हिंग क्रेनने महामार्गालगतचे चार ते पाच संरक्षक दगडही उखडून टाकले.
या अपघातात दुचाकीवरील तेजस्विनी मसुगडे व किरण मसुगडे या सख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या. ग्रामस्थ व महामार्गावरील इतर वाहनचालकांनी त्यांना तत्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून दोघींनाही उपचारासाठी सातारा येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. मात्र उपचारापूर्वी तेजस्विनी मसुगडे हिचा मृत्यू झाला, तर किरण मसुगडे हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम,चालक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने व टोव्हिंग क्रेनचालक इरफान मुबारक मुजावर (रा.कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत अधिक तपास हवालदार मनोहर सुर्वे हे करीत आहेत.