दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजाराचे बँक खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:19+5:302021-07-03T04:24:19+5:30
पालकांची भिरकिट; पोषण आहाराची रक्कम खात्यात जमा होणार लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्य शासनाच्यावतीने पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या ...
पालकांची भिरकिट; पोषण आहाराची रक्कम खात्यात जमा होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्य शासनाच्यावतीने पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. पण, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे बँक खातेच नसल्याने है पैसे जमा होणे अशक्य आहे. त्यामुळे पालकांनी बँकांमध्ये हेलपाटे मारायला सुरुवात केली आहे.
अवघ्या दीडशे ते अडीचशे रुपयांसाठी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागत असून, कोरोनाच्या काळात जवळ पैसे नसताना आर्थिक भुर्दंड पडला असल्याने पालकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. शासनाने पालकांचे बँक खाते मागवून त्यात ही रक्कम जमा केली तर सोयीचे होऊ शकते. मुलांच्या गरजा या पालकच पूर्ण करत असतात. या पध्दतीने मुलांचे स्वतंत्र बँक खाते काढायला सांगणे म्हणजे पालकांवर अविश्वास दाखवल्यासारखे आहे, अशी पालकांची तक्रार आहे. तसेच नकळत्या वयात मुलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले तर त्याचा गैरवापरदेखील होऊ शकतो, असे पालकांचे म्हणणे आहे. शासनाने आपला निर्णय बदलून पालकांना होत असलेला मनस्ताप थांबवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोट...
राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्वच शाळांना सूचना करण्यात आल्या आहेत. पोषण आहाराची रक्कम ही थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याने बँक खाते गरजेचे आहे.
प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी
पालकांची डोकेदुखी
कोट...
प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या मुलांचे बँक खाते काढण्याचा प्रसंगच कधी येत नाही. त्यामुळे आमच्या मुलाचे बँक खाते काढलेले नाही. आता बँक खाते काढल्याशिवाय पोषण आहाराची रक्कम जमा होणार नसल्याने बँक खाते काढावे लागणार आहे.
प्रशांत बाबर
कोट...
शासनाकडून दीडशे ते अडीचशे रुपये जमा होणार आहेत. त्यासाठी हजार रुपये घालवून बँक खाते काढावे लागणार आहे. वास्तविक कोरोनामुळे हातात पैसे राहिलेले नाहीत. मुलांच्या शाळांची फी देखील कशीबशी भरली आहे. शासनाने पालकांचे बँक खाते मागितले असते तर बरे झाले असते.
सूरज निंबाळकर
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार १५६ रुपये
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार २३४ रुपये
बँक खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये
कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडायचे झाल्यास १ हजार रुपये तरी लागतात. सध्याच्या काळात लोकांना पैशांची गरज आहे. एवढ्या रुपयांत महिन्याचा किराणा भरता येऊ शकतो. मुलांच्या शाळांची फी देखील भरावी लागणार असल्याने पालकांना चिंता वाढली आहे. अवघ्या अडीचशे रुपयांसाठी स्वतंत्र बँक खाते काढावे लागत असल्याने शासनाने हा द्रविडीप्राणायाम करण्यापेक्षा पालकांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करावेत, अशी मागणी आहे.
पहिली : ४०,३७३
दुसरी : ३९,५१२
तिसरी : ३८,९९८
चौथी : ४३,५५०
पाचवी : ४०,६३२
सहावी : २६,८५८
सातवी : २६,५१९
आठवी : १७,८९७