कुडाळमध्ये एक हजार लसीकरणाचा टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:40 AM2021-04-07T04:40:15+5:302021-04-07T04:40:15+5:30
कुडाळ : कुडाळ (ता. जावळी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी ...
कुडाळ : कुडाळ (ता. जावळी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना लसीकरणासाठी योग्य नियोजन केले आहे. यामुळे केंद्राने एक हजार इतका लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. याठिकाणी नियोजनपूर्वक लसीकरण राबवले जात असून नागरिकांनी लसीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर यांनी केले आहे.
कुडाळ केंद्रांतर्गत कुडाळ, हातगेघर, खर्शी, वालुथ, हुमगाव, दापवडी ही उपकेंद्र येतात. यामध्ये सुमारे ३० हजार इतकी लोकसंख्या आहे. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते, कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर, डॉ. स्वामिनी चव्हाणके, श्रीधर कांबळे, तसेच उपकेंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने कोरोना लस दिली जात आहे.
महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई, प्राथमिक शिक्षक आदींनी लस घेतलेली आहे. त्याचबरोबर गावपातळीवर नागरिकांना लसीकरणासाठी जनजागृती करून प्रशासनास मोलाचे सहकार्य करीत आहेत. आरोग्य यंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणा कोरोना नियंत्रणासाठी रात्रंदिवस झटत असून त्यांच्याकडून प्रबोधन देखील करण्यात येत आहे. त्यामुळे आजअखेर कुडाळ प्रथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत उपकेंद्रातून सुमारे एक हजार लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे.
(
चौकट)
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये..
जावळी तालुक्यात कोरोना लसीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने वेगात सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र याठिकणी ४५ वय वर्षावरील सर्वांची नोंदणी होत असून याकामी तंत्रस्नेही शिक्षकांची मदत होत आहे. तसेच प्रशासनामार्फत प्रत्येक गावात लोकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. नोंदणीकृत व नोंदणी न झालेल्या नागरिकांनीही लसीकरणासाठी तत्परतेने पुढे यावे. तसेच आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र याठिकणी जाऊन लस घ्यावी. लसीबाबत सुरक्षिततेच्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता निर्भयपणे लस टोचून घ्यावी.
०६ कुडाळ
फोटो : कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.