नाट्य चळवळ वाढीसाठी एकांकिका स्पर्धा उपयुक्त
By Admin | Published: May 12, 2017 10:28 PM2017-05-12T22:28:01+5:302017-05-12T22:28:01+5:30
नाट्य चळवळ वाढीसाठी एकांकिका स्पर्धा उपयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘समाजाची विविध कामे करताना समाजाची सांस्कृतिक भूक भागवण्याचे कार्यही सातारा पालिका कै. श्री. दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून करत आहे. माणसे कलेनेच घडवली जातात, त्यासाठी सांस्कृ तिक वसा असणेही महत्त्वाचे आहे व यातूनच चांगले विचार व दिशा मिळते. आज ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा नगरीला मोठे स्थान मिळाले आहे,’ असे उद्गार राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी काढले.
सातारा नगरपालिकेच्या वतीने आयोजित माजी नगराध्यक्ष कै. श्री. दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शाहू कला मंदिरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानावरून राजमातांनी वरील उद्गार काढले.
या उद्घाटन समारंभास सध्या ‘झी मराठी’वर लोकप्रिय होत असलेल्या आणि सबकुछ सातारा असलेल्या ‘लागिर झालं जी..’ या मराठी मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदे, लेखक तेजपाल वाघ, भूमिका आरेखक मकरंद गोसावी, ज्येष्ठ मार्गदर्शक संभाजीराव पाटणे, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, स्पर्धेच्या कार्याध्यक्ष स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, कार्यवाह कल्याण राक्षे, स्पर्धेचे परीक्षकांसह विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवक यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराजाचे पूजन करून या स्पर्धेचेउद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार पालिकेच्या वतीने करण्यात आला. यावेळी कल्याण राक्षे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘गेली दोन वर्षे या स्पर्धा सुरू असून, पालिकेने सामाजिक बांधिलकी जपतानाच साताऱ्याच्या नाट्य आणि सांस्कृतिक चळवळीला चालना देणारा हा उपक्रम सुरू केला. यातून उद्याचे भावी यशस्वी कलाकार निर्माण होत राहतील व त्यांच्यासाठी ही स्पर्धा एक चांगले व्यासपीठ ठरणार आहे.’
प्रमुख पाहुण्या श्वेता शिंदे म्हणाल्या, ‘मीही साताऱ्याचीच असून, माझी कार्यकाळास सुरुवात करताना मला स्ट्रगल करत मुंबईत जाऊन पर्याय शोधावा लागला. आता सातारा ही सर्वच चित्र, नाट्य आणि टीव्ही सिरियलसाठी एक चांगले क्षेत्र निर्माण झाले आहे. सातारकरांच्या मदत आणि सहकार्याने या स्पर्धा मोठ्या होत आहेत व यातूनच आमच्या मालिकेला अनेक उत्तमोत्तम कलाकार मिळाले, हे खूपच आनंदाचे आहे. पालिकेने निर्माण केलेले हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने नव्या कलाकारांना संधी आहे, त्याचे सोने करा.’
नगराध्यक्षा माधवी कदम यांनी या एकांकिका स्पर्धा मागील वर्षी सुरू झाल्या. आमची सत्ता ४ महिने असतानाही आज शहरात अनेक भरीव विकासकामे सुरू असून, महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. साताऱ्याच्या सांस्कृतिक क्षेतात भर घालणारा हा उपक्रम असाच वाढत जाईल, असा विश्वास वाटतो, असे आपल्या मनोगतात सांगितले.
ज्येष्ठ मार्गदर्शक संभाजीराव पाटणे यांनी सातारा पालिकेने लोकजीवन समृद्ध करण्यासाठी सुरू केलेले शिवजयंती, मान्यवरांचे सत्कार व या एकांकिका स्पर्धा खरोखरच स्तुत्य आहेत. साताऱ्याची नाट्य चळवळ अनेक दिग्गज कलाकारांनी समृद्ध केली. यासाठी अनेकांचे योगदान लाभले.
राजमाता कल्पनाराजे म्हणाल्या, ‘या स्पर्धा म्हणजे खऱ्या अर्थाने दादामहाराजांना श्रद्धांजली आहे. स्वत: दादामहाराज एक चांगले कलाकार होते व त्यांना विविध कलांची जाण व आवड होती. अनेकांना त्यांनी कलेसाठी उत्तेजीत व प्रोत्साहीत करून मदत केली. आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने हा उपक्रम सुरू केला व त्याला मोठा प्रतिसाद लाभत आहे. अनेक दिग्गज कलाकार सातारा येथे घडले व घडत आहेत.’
कार्यक्र माचे हेमांगी जोशी आणि चित्र भिसे यांनी सूत्रसंचालन केले. उपनगराध्यक्ष राजू भोसले यांनी आभार मानले.